पुन्य वार्ता
संगमनेर (प्रतिनिधी)–प्रत्येकाने स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण हे अत्यंत गरजेचे आहे. चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले आरोग्य आवश्यक असल्याने विद्यार्थी व युवकांनी मोबाईल मध्ये अधिक व्यस्त न राहता मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे असे आवाहन मा. शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर राष्ट्रीय दलित पॅंथर, आजाद हिंद सेना व घुलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित लोकनेते चषक 2025 च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत जि प सदस्य सीताराम राऊत, नवनाथ आरगडे, कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, सरपंच निर्मला राऊत, नवनाथ आंबरे, रवी गिरी, राजू खरात, उपसरपंच अनिल राऊत, भास्कर पानसरे, बाळासाहेब पानसरे, नवनाथ हाडवळे, रवी पांडे, शिवा मांचरेकर, अनिल केदारी, विजय काठे ,दत्तात्रेय राऊत ,अनिल के राऊत, प्रदीप ढमाले ,विलास राऊत, चंदू क्षीरसागर ,सुनील रोकडे ,निलेश सातपुते, हरि ढमाले आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि भारतामध्ये तो अत्यंत लोकप्रिय आहे. अजिंक्य रहाणे या संगमनेरच्या सुपुत्राने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. सहकार महर्षी चषक, राजवर्धन चषक अशा विविध स्पर्धांचे संगमनेर मध्ये आयोजन होत असते. क्रिकेटमुळे निर्णय क्षमता चपळता वाढीस लागते. खेळामध्ये जय पराजय होतच असतो. हार जीत पचवण्याची क्षमता निर्माण होते. यामुळे जीवन जगताना माणूस खंबीर होतो.

सध्या मोबाईल मुळे विद्यार्थी आणि युवक व्यस्त झाले आहेत अनेकांना आरोग्याच्या व्याधी जडले आहे आणि भविष्याच्या दृष्टीने ती अत्यंत चिंताजनक आहे. चांगल्या शिक्षणाबरोबर चांगले आरोग्य महत्त्वाचे आहे आणि त्याकरता मैदानी खेळ अत्यंत गरजेचे आहे. मागील पिढीमध्ये मैदानी खेळाला प्राधान्य होते त्यामुळे आजचे युवक सक्षम आहेत परंतु भविष्यामध्ये युवकांमध्ये आरोग्याच्या चिंता वाढू शकतात यासाठी प्रत्येकाने मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. शिक्षक व पालकांनीही मुलांना मोबाईल मध्ये व्यस्त न ठेवता मैदानाकडे वळवावे असे आवाहन त्यांनी केले.
तर सिताराम राऊत म्हणाले की माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील युवकांना विविध कलागुणांसाठी व्यासपीठ निर्माण करून दिले जात आहे तालुक्यातील अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत असून संगमनेरचा लौकिक वाढवत आहे. लोकनेते चषकामध्ये मोठ्या बक्षिसांचा समावेश असून तालुक्यातील विविध संघांनी घेतलेला सहभाग हा कौतुकास्पद ठरणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवनाथ अंबरे यांनी केले तर रवी गिरी यांनी आभार मानले.
अमृतेश्वर मंदिरासमोर अत्यंत सुंदर मैदान बनवण्यात आले असून यामध्ये 30 संघांचा सहभाग आहे. षटकारा चौकारांची आतिषबाजी होत असल्याने क्रिकेट रसिकांसाठी ही मोठी मेजवानी असणार आहे.


