पुन्य वार्ता
शिर्डी (प्रतिनिधी) – जगातील कोट्यवधी भाविक भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या शिर्डीतील साईबाबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेण्याचा मान दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे आणि दैनिक समर्थ गांवकरी चे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर व
पञकार पंढरीनाथ पगार यांना नुकताच लाभला. भाविकतेने ओथंबलेल्या वातावरणात झालेल्या या भेटीत साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी समाधीस्थळाचा पवित्र अनुभव घेतला.
या भेटीच्या निमित्ताने शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी डॉ. विश्वासराव आरोटे आणि संजय फुलसुंदर यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. या सन्मानाने उपस्थित भाविकांसह पत्रकार बांधवांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमादरम्यान गोरक्ष गाडीलकर यांनी दैनिक समर्थ गांवकरी या वर्तमानपत्राच्या प्रामाणिक, निर्भीड आणि लोकहितार्थ पत्रकारितेची प्रशंसा केली. डॉ. विश्वासराव आरोटे यांनी राज्यातील पत्रकार संघटनांच्या बळकटीकरणासाठी, तसेच ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच, संजय फुलसुंदर यांनी प्रशासनिक व व्यवस्थापन क्षेत्रात दिलेल्या योगदानाचीही दखल घेण्यात आली.
साईबाबांच्या दर्शनानंतर झालेल्या या सत्कार सोहळ्यात श्रद्धा, सबुरी आणि सेवाभावाचा संदेश जणू प्रत्यक्ष अनुभूतीस आला. उपस्थितांनी या प्रसंगाचे स्मरणीय क्षण छायाचित्रांत कैद करत, समाधीस्थळाच्या आध्यात्मिक वातावरणात मन:शांतीचा अनुभव घेतला.
सत्कार कार्यक्रमामुळे साईभक्त आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांमध्ये परस्पर आदर, प्रेरणा आणि समाजसेवेचा नवा संकल्प जागृत झाला.


