पुण्य वार्ता
अहमदनगर प्रतिनिधी
पुस्तके वाचनामुळे माणसं वाचता येतात, माणसांच्या उंची कळण्यास मदत होते.भाषा जगली तरच स्वातंत्र्य अबाधित राहते. समाजाची भाषा ही समाज मनामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करत असते. भाषेची समृद्धता ही साहित्य वाचनातूनच विकसित होण्यास मदत होत असते. उष्णते वाचनामुळे स्वतःच्या जीवनात परिवर्तन करण्याची वाट सापडत असते असे प्रतिपादन राज्य अभ्यासक्रम पुनर्रचना समितीचे सदस्य, साहित्यिक संदीप वाकचौरे यांनी केले ते अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर ,पोलीस अधीक्षक राकेश ओला ,अप्पर जिल्हाधिकारी श्री बाळासाहेब कोळेकर, राजेंद्र कुमार पाटील , राहूल पाटील,भाषा समितीचे सदस्य डॉ संजय कळमकर , किशोर मरकड,प्रा.शशिकांत शिंदे, श्री घोरपडे आदी उपस्थित होते.
वाकचौरे आपल्या व्याख्यानात म्हणाले की, माणसाच्या आयुष्यामध्ये पुस्तक वाचनाची सवय माणसाला अधिक प्रामाणिकपणाच्या दिशेने घेऊन जाते. माणसांमध्ये संवेदनशीलता ,विवेक आणि शहाणपण वृंध्दीगत करण्यासाठी वाचनाची सवय अधिक महत्त्वाची आहे. कोणताही समाज आणि राष्ट्र प्रगत होते त्यामध्ये वाचणाऱ्या समाजाचे मोठी योगदान असते. माणसाला आनंदाने जगण्यासाठी, आपले ताणतणाव कमी करण्यासाठी पुस्तके मदत करत असतात. पुस्तकामुळे आयुष्य समृद्ध होत असते. भाषा शुद्धिचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तो इतिहासामध्ये निर्मिल्या गेलेल्या समृद्ध वाटांचा परिणाम आहे. वर्तमानात आपल्याला मराठी भाषेच्या दृष्टीने साहित्यामध्ये विशेष योगदान देण्याची गरज आहे. आज इंग्रजी माध्यमातील शिक्षणाकडे पालकांचा कल वाढत चालला आहे .याचे कारण इंग्रजी ज्ञानभाषा आहे असं समज लोकांचा झाला आहे. मात्र इंग्रजी मुळे रोजगार मिळत असेल तर लोकांचा त्या दिशेचा असणे साहजिक आहे. त्यामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषेच्या दृष्टीने प्रवास घडवून आणण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे .मराठी भाषा ही रोजगारभिमुख होण्यासाठी मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांनीच प्रयत्न करण्याची गरज आहे. मातृभाषा ही माणसाच्या मनामध्ये स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण करत असते. स्वातंत्र्याचा प्रवास पारतंत्र्याकडे सुरू होण्यास मदत होते. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने संकल्प करत पुस्तक वाचण्याचा प्रवास घडवायला हवा असे मत व्यक्त केले. यावेळी शासनाच्या ग्रंथालय विभागाच्या वतीने पुस्तक प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन वाकचौरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय कळमकर यांनी करून दिला. किशोर मरकड यांनी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला त्यास उपस्थितांनी अनुमोदन दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी शशिकांत शिंदे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने अधिकारी, कर्मचारी ,नागरिक उपस्थित होते.


