पुण्य वार्ता
मुंबई: देशातील नामवंत समाजसेवक आणि थोर दानशूर डॉ. नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि “दैनिक समर्थ गावकरी” चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी नानजीभाई ठक्कर यांची विशेष सदिच्छा भेट घेतली. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना शाल, श्रीफळ, आणि घड्याळ देऊन गौरविण्यात आले. हा सन्मान सोहळा समाजसेवेतील एका थोर कार्यकर्त्याला दिलेली मान्यता असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
कार्यक्रमात उपस्थित असलेले माळशेज नागरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. चंद्रकांत महाराज डुंबरे, नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा “दैनिक समर्थ गांवकरी” चे विभागीय संपादक दशरथ चव्हाण, आणि पत्रकार विष्णु बुरे यांनीही नानजी भाई ठक्कर यांचा यथोचित सन्मान केला!
पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित
सन्मान स्वीकारताना नानजीभाई ठक्कर यांनी पत्रकारितेचे महत्त्व विषद करत, “पत्रकार हे समाजातील एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहेत. त्यांच्या माध्यमातून संपूर्ण गावाला जगभरातील घडामोडी कळू शकतात. पत्रकार प्रामाणिक आणि निष्ठावंत असावा, कारण पत्रकारांच्या सत्य आणि प्रामाणिकतेने अनेक अवैध घटना रोखल्या जाऊ शकतात,” असे मत व्यक्त केले.
तसेच त्यांनी असेही म्हटले की, “भ्रष्टाचार रोखण्यासाठी पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महाराष्ट्रातील पत्रकारांनी आपल्या कार्यातून समाजाच्या हितासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. पत्रकारांनी त्यांचे कर्म निष्ठेने करत राहावे, त्याचे फळ नक्कीच मिळेल.”
डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या कार्याचे विशेष कौतुक:
नानजी भाई ठक्कर यांनी विशेषतः “दैनिक समर्थ गांवकरी चे” संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या कार्याचे कौतुक केले. “मराठी वृत्तपत्र चालवणे हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे, मात्र डॉ. विश्वासराव आरोटे यांनी हे कार्य यशस्वीपणे पूर्ण केले आहे,” असे सांगून त्यांनी डॉ. आरोटे यांचे अभिनंदन केले आणि त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
समाजसेवेसाठी ठक्कर यांचे योगदान अमूल्य:
नानजीभाई ठक्कर यांनी आपल्या समाजसेवेतील कामगिरीबद्दल सांगितले की, “गरजू आणि गरीब लोकांसाठी आम्ही उभारलेल्या दवाखान्यात मोफत उपचार पुरवले जातात. आम्हाला दररोज अनेक लोक मदतीसाठी येतात आणि आम्ही त्यांना शक्य तितकी मदत देत असतो. देव नेहमीच आम्हाला मदत करत असतो, आणि आम्ही आमचे काम निष्ठेने करत राहू.”
कार्यक्रमाच्या शेवटी नानजीभाई ठक्कर यांनी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या.
सन्मान सोहळा पत्रकारितेच्या महत्त्वाचे प्रतिक:
या सन्मान सोहळ्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकार संघाच्या कार्याची महत्त्वपूर्ण दखल घेण्यात आली असून, पत्रकारितेच्या प्रामाणिकतेच्या आणि निष्ठेच्या अधिष्ठानावर समाजाला दिशा देण्याचे महत्त्व पुनः एकदा अधोरेखित झाले आहे…

