पुण्य वार्ता
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव कोझिंरा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण शालेय साहित्य वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरविणे, जेणेकरून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागू शकेल.
शुभम घुले यांच्या विनंतीवरून या मदतीचा उपक्रम राबवण्यात आला. या निमित्ताने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आणि आमदार सत्यजित तांबे यांचे समर्थक म्हणून घुले यांनी स्थानिक शाळांना मदत मिळावी यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्याच प्रयत्नांतून कोकणेवाडी, कारवाडी आणि गावठाण या भागांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे, संगमनेर तालुका अध्यक्ष संजय गोपाळे, तसेच ग्रामपंचायत पिंपळगाव कोझिंरा यांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रथम नागरिक सरपंच सोनाली ताई करपे, उपसरपंच संगम आहेर, शाळेचे मुख्याध्यापक सोनवणे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमात स्थानिक ग्रामस्थ बादशाह पाटील वाळुंज, रोहिदास पाटील मोरे, संदीप करपे, दत्तात्रय कडलक, संजय खर्डे, बाबासाहेब आहेर आणि इतर नागरिकांनी देखील सहभाग घेतला.


