पुण्य वार्ता
संगमनेर वार्ताहर
महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले कुशल मनुष्यबळ आणि अन्य प्रगत युरोपियन देशांमध्ये त्यांची असणारी कमतरता या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे दृष्टीने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ राजेश बनकर यांनी केले आहे.
त्यासाठी पूर्वतयारी म्हणून भाषा अवगत करणे आवश्यक असणार आहे. या संदर्भाने राज्यातील युवकांना संधी उपलब्ध असणार आहे.
ही बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने जर्मन देशातील बाडेन- बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देणे याबाबत सामंजस्य करार केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारच्या वतीने पुढील कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी शासन निर्णय जुलै महिन्यात काढण्यात आलेला आहे.
या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे. व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत पात्र उमेदवारांना आवश्यक ते जर्मन भाषेचे प्रशिक्षण व आवश्यक असल्यास अधिकचे कौशल्य विकास प्रशिक्षण शासनामार्फत मोफत स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अहमदनगर येथे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. अधिक विद्यार्थी नोंदणी केल्यास गरजेप्रमाणे प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येईल.शासन निर्णयानुसार जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्यां व सदर उपक्रमांतर्गत निवडलेल्या पदाचे व्यावसायिक कौशल्य प्राप्त अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/ या संकेतस्थळावर आपली नाव नोंदणी करावी. सदर उपक्रमातील कौशल्या संदर्भात सद्यस्थितीमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम शिकत असणाऱे विद्यार्थी या उपक्रमासाठी नोंदणी करण्यास पात्र असणार नाहीत असेही बनकर यांनी सांगितले.
