पुण्य वार्ता
राजूर: संगमनेर येथील डॉ अतुल आरोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अकोले तालुक्यातील केळुंगण येथील कै. नानासाहेब विठोबा देशमुख वृद्धाश्रमातील वृद्धांच्या आरोग्याची मोफत तपासणी केली.
संगमनेर येथे दहा वर्षां पूर्वी चितळवेढे येथील अतुल आरोटे या तरुणाने वैद्यकीय पदवी प्राप्त केली.वैद्यकीय क्षेत्रातील अधिक ज्ञान आत्मसात करत त्यांनी संगमनेर येथे मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल उभे केले.व्यवसाय करत असताना आपली सामाजिक बांधिलकी त्यांनी सातत्याने जपली. अकोले तालुक्यातील आपल्या परिसरातील खेडे गावांतून येणाऱ्या रुग्णांची अल्पदरात तपासणी करत त्यांना योग्य सल्ला ते नेहमीच देत असतात.
स्वातंत्र दिनी त्यांच्या या व्यवसायाला तसेच त्यांच्या सेवेला दहा वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी आपल्या हॉस्पिटलचा दहावा वर्धापन दिन केळुंगण येथील वृद्धाश्रमातील वयोवृद्धांची आरोग्य तपासणी करत साजरा केला.
चितळवेढे येथील अश्वमेध सेवाभावी संस्था व डॉ आरोटे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ४८ वृद्धांची डॉक्टर आरोटे यांनी तपासणी केली. यात रक्ताच्या काही चाचण्या , इसीजी, शुगर, रक्तदाब आदी तपासण्या करण्यात आल्या. तर काही रुग्णांना आपल्या संगमनेर येथील दवाखान्यात उपचारासाठी बोलवले.
आपल्या सहकाऱ्यां समवेत त्यांनी या वृद्धांच्या किरकोळ आरोग्याच्या समस्या जाणून घेतल्या.सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड मनोहरराव देशमुख साहेब हे आपली कशी काळजी घेतात , मुंबई येथून येथे आल्या नंतर ते आमच्याशी संवाद साधत आमचे मनोबल कसे वाढेल याचा सातत्याने प्रयत्न करत असल्याचे त्यांनी डॉ आरोटे यांना सांगितले. डॉ आरोटे यांना त्यांच्या दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक सचिन वाकचौरे,गणेश शेटे व तेथील कर्मचाऱ्यांनी या वेळी सहकार्य केले.


