पुण्य वार्ता
ब्राम्हणवाडा (अकोले)
प्रतिनिधी: संजय भाऊ गायकर
गरजवंत शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करून माजी विद्यार्थिनीने तिच्या मुलीचा वाढदिवस केला साजरा!
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व डॉ.विश्वासराव आरोटे ह्यांचा आदर्श घेत सह्याद्री विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनीने तिच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्ताने सहयाद्री विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले.
आज अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावात सहयाद्री विद्यालयाची माजी विद्यार्थीनी पूजा टाकळकर व तिचे पती उद्योजक धनंजय टाकळकर (पिंपळवंडी) ह्या दोघांनी समाजसेवेचे आदर्श उदाहरण म्हणून ह्या उपक्रमाची योजना केली. आज त्यांची मुलगी तेजस्वी हिचा चौथा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देत त्यांनी हा वाढदिवस विद्यार्थ्यांना शालेय वस्तू दप्तर, वही, पेन वाटप करत साजरा केला.
या उपक्रमामध्ये त्यांनी गरजवंत ३७ विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले आहे, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले आणि त्यांना शालेय साहित्य मिळाल्यामुळे आनंद झाला. विद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि त्यांच्या आदर्श कार्याचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील ह्या उदात्त कार्याची विशेष प्रशंसा केली.
माजी विद्यार्थीनी पूजा टाकळकर हिने आपल्या भाषणात शिक्षणाच्या महत्वावर जोर देत समाजातील गरजू लोकांनी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. ह्या उपक्रमामुळे एक सकारात्मक सामाजिक संदेश पसरला आणि समाजात एक आदर्श निर्माण झाला आहे.
ह्या कार्यक्रमासाठी उद्योजक श्री.धनंजय टाकळकर, ग्रामपंचायत सदस्य श्री.रवींद्र हांडे, ग्रामपंचायत सदस्य श्री.शिवाजी आरोटे, पोलीस पाटील डॉ.श्री.शिवाजी हांडे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री.शिवराम आरोटे, ग्रामस्थ श्री.रामदास आरोटे, तसेच सह्याद्री विद्यालय ब्राम्हणवाडा प्राचार्य शेलार मॅडम, शिक्षक श्री.जनार्दन हासे सर, श्री.सोनवणे सर, श्री.साबळे सर, श्री.मंडलिक सर तसेच सर्व शिक्षक वर्ग, सर्व कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते!


