पुण्य वार्ता
मुंबई प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर, नागपूर दिक्षाभूमी ते मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा ही यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेली होती. आंदोलनानंतर महायुती सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाण्याची आशा निर्माण झाली आहे. या प्रसंगी, राज्याचे मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकारांना आश्वासन दिले की, त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाईल आणि योग्य निर्णय घेतले जातील. लाडकी पत्रकार ही योजना सुरू करणार असे आश्वासन नामदार लोढा यांनी दिले
या पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने ना. चंद्रकांत दादा पाटील, ना. मंगलप्रभात लोढा आणि माजी मंत्री आ. पंकजाताई मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्यांमध्ये पत्रकारांच्या शाश्वत सुरक्षिततेसाठी विशेष योजना लागू करण्याची मागणी होती. यावर प्रतिक्रिया देताना ना. मंगलप्रभात लोढा यांनी आठ दिवसांत मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री ना. अजित दादा पवार यांच्या समवेत बैठक घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
“एक वज्र मुठ, एक संघटन, दोन नेते” अशा घोषणांनी पत्रकारांच्या या आंदोलनाला बळ मिळाले आहे. राज्यातील पत्रकारांनी आता शाश्वत लढाईत उतरण्याचा निर्धार केला आहे. महायुती सरकारने याची दखल घेतली असून, “अबकी बार पत्रकारांना होणार शाश्वत लाडका पत्रकार योजना” अशी अपेक्षा पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.
या पत्रकार संवाद यात्रेचे नेतृत्व वसंत मुंडे, संजय भोकरे, डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले, मात्र ही लढाई केवळ त्यांची नसून, संपूर्ण राज्यातील पत्रकारांची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील पत्रकारांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही लढाई पुढे नेण्यात येणार आहे.
सरकारकडून यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून, या निर्णयाचा राज्यातील पत्रकारांच्या भवितव्यावर मोठा प्रभाव पडणार आहे. “लाडकी बहीण, लाडका भाऊ” या संज्ञांचा वापर आता “लाडका पत्रकार” योजनेवर होण्याची अपेक्षा सर्वत्र आहे, ज्यामुळे पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक त्वरित होईल.

