अकोले ( प्रतिनिधी ) उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेली अमृतवाहिनी प्रवरामाते च्या तिरावरील तीर्थक्षेत्र दर्शन व स्वच्छता यासाठी “प्रवरा परिक्रमा” हा उपक्रम ९ व १० नोव्हेंबर रोजी राबवीला जाणार आहे. अशी माहिती अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष के. डी. धुमाळ यांनी दिली.
” प्रवरा परिक्रमा” ही प्राचार्य डाॅ.अनिल सहस्त्रबुद्धे यांचे मार्गदर्शना खाली आयोजित केली जात आहे. अकोले तालुक्यातील अमृतेश्वर रतनगड येथून उगम पावणारी अमृतवाहिनी प्रवरा माता नेवासा तालुक्याच्या कायगाव टोका येथे गोदावरी मातेत विलीन होते. अकोले, संगमनेर, राहता, श्रीरामपूर, नेवासा या पाच तालुक्याची तहान भागवत, शेती सुजलाम सुफालम केली आहे. यामुळे अनेक साखर कारखाने या नदीच्या काठी उभारले आहेत.
प्रवरा तिराला अनेक पौराणिक, धार्मिक, ऐत्याहासिक भाग आहे. देव दानवांच्या युद्धात राहू ने गिळलेले अमृत त्याचा शिरच्छेद केल्यानंतर ते प्रवरा नदीत पडले म्हणून तिला अमृतवाहिनी म्हणतात. अकोले तालुक्यातील उगम ठिकाण अती प्राचीन अमृतेश्वर, तातोबा चा वाल्मिक ऋषी आश्रम, रंधा आदिवासी समाजाचे कुलदैवत घोरपडा देवी, म्हाळादेवी चा खंडोबा, इंदुरीच प्रती पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर, उंचखडक चे राममाळ, अगस्ती ऋषी आश्रम, कुंभेफळ चा शेषनारायण, कळस चे कळसेश्वर मंदिर प.पू. सुभाषपुरी महाराज देवस्थान आहेत. संगमनेर तालुक्यात धांदरफळ चा धौम्य ऋषी आश्रम, मंगळापूर चे कार्तिक स्वामी आश्रम, खांडगाव चे खांडेश्वर महादेव, जोरवे ची प्राचीन संस्कृती दत्त देवस्थान, राहता तालुक्यातील कोल्हार ची माता भागवती, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर चे केशव गोविंद बन, नेवासा येथे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी चे लेखन, दत्त देवस्थान देवगड असे धार्मिक पौराणिक महात्म आहे. छत्रपती शिवराय यांची शेवट ची लढाई रायते ( संगमनेर ) तर भंडारदरा धरण परिसरातील क्रांतिवीर राघोजी भांगरे यांचे बंड याचं तिरावर घडले. असे ऐत्याहासिक महत्व आहे.
या प्रवरा मातेच्या तिरावर आपला जन्म झाला हे आपलं भाग्य आहे. म्हणून प्रवरा काठच्या तीर्थक्षेत्र दर्शन व नदी स्वच्छता,जल प्रदूषण व पर्यावरण संवर्धनासाठी २ दिवसीय प्रबोधन यात्रेचे आयोजन केले आहे.
“मोटर सायकल परिक्रमा”
आपण सर्व पर्यावरण प्रेमींनी प्रवरामातेची कृतज्ञता म्हणून या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री अगस्ति देवस्थान ट्रस्ट अकोले च्या वतीने करण्यात आले आहे. तरी दिपक महाराज देशमुख, चंद्रकांत महाराज चौधरी, राजेंद्र महाराज नवले, गणेश महाराज वाकचौरे, नितीन महाराज गोडसे, रामनाथ मुतडक व्यवस्थापक यांच्या शी संपर्क साधावा.
