पुण्य वार्ता
राजूर/प्रतिनिधी(सचिन लगड)
अकोले तालुक्यातील समशेरपुर,सावरगाव पाट,पाडोशी, पिंपळदरावाडी,एकदरे,जायनावाडी येथे महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या मदतीने तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी व मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात आले.जून ते सप्टेंबर पावसाळी हंगाम संपल्यानंतर बऱ्याच कालावधीपर्यंत नाले व ओढ्या मधून पाण्याचा प्रवाह चालू असतो. हा पाण्याचा प्रवाह पारंपारिक पद्धतीने आडून सिमेंट व खताच्या रिकाम्या गोण्या,माती व वाळू यांच्या साह्याने पाणलोट क्षेत्र व पाणलोट क्षेत्राच्या बाहेरही वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.वनराई बंधारा बांधण्यासाठी कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी साठा होईल अशी जागा निवडली जाते.प्रामुख्याने त्या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग जनावरांना पाणी पिण्यासाठी महिलांना कपडे,भांडे धुण्यासाठी तसेच बंधाऱ्याच्या आजूबाजूच्या परिसरातील विहिरीतील पाणी पातळीत वाढ होण्यासाठी होणार आहे.वनराई बंधारा पाणीसाठामधून पाणी उपसा करून रब्बी हंगाम पिके गहू हरभरा व भाजीपाला पिकांसाठी बंधार्यातील पाणी उपयोगी पडते सदर बंधारा बांधण्यासाठी समशेरपुर परिसरातील कृषी सेवा केंद्र धारक यांनी सिमेंट व खताच्या रिकाम्या गोण्यांचा पुरवठा केला. राजेंद्र बिन्नर मंडळ कृषी अधिकारी यांनी बोलताना सांगितले की,दरवर्षी प्रत्येक गावात वनराई बंधारे लोकसहभागातून बांधले जातात त्या बंधाऱ्यातील पाण्याचा उपयोग पाळीव जनावरे,रब्बी पिकांना होतो.वनराई बंधाऱ्यांमुळे आजूबाजूच्या परिसरात पाणी पातळीत वाढ होते.तसेच ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी यांनी सांगितले की,समशेरपुर गावात कृषी विभाग अधिकारी व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहभागातून बांधण्यात आलेला बंधारा महिलांना धुनी,भांडी व जनावरांना पाणी पिण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर, कृषी पर्यवेक्षक संदीप जोर्वेकर,साहेबराव वायाळ, कृषी सहाय्यक राघू पेढेकर,अरुण बांबेरे,नाथु शेंडे,अनिल बांबेरे,रवींद्र मांडवे,चंद्रकांत गिऱ्हे, रूपाली भांगरे,ग्रामपंचायत सदस्य दत्तू चौधरी यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
