पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र अकोले च्या सेवेकाऱ्यांच्या योगदानातून उभारलेल्या ‘ नातवंड पार्क ‘ चे अकोले तालुक्याचे आ.डॉ.किरण लहामटे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.
यावेळी आ.डॉ.किरण लहामटे म्हणाले की, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने लहान मुलांवर होणाऱ्या बाल संस्कारामुळे निश्चित राष्ट्र उभारणी होईल,माझ्यावर ही स्वामींची कृपा दृष्टी असल्याचा मला अनुभव आलेला असून मला अनेक मंदिरे,केंद्रासाठी आर्थिक निधी देण्याचे भाग्य मिळाले. या नातवंड पार्क उभारणी साठी मला सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो.या नातवंड पार्क मुळे निश्चित अकोले शहराच्या वैभवात भर पडली असून या पार्क मध्ये अधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने मी सहकार्य करीन असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर आ.डॉ.किरण लहामटे,उपनगराध्यक्ष शरदराव नवले, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी मारुती लांघी, सेवा निवृत्त वन सरंक्षक अधिकारी चंद्रकांत भारमल, अक्षय आभाळे,अंकुश वैद्य,हरिभाऊ फापाळे,संजय हुजबंद, नगरपंचायत चे बांधकाम विभागाचे अधिकारी उत्तमराव शेणकर होते तसेच यावेळी महिला व पुरुष सेवेकरी,नातवंडे, आजी आजोबा मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नातवंड पार्क साठी आ.लहामटे यांनी 3,31,000/-
रुपये मदत केली. त्याबद्दल आ.डॉ.किरण लहामटे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक संजय हुजबंद यांनी करताना या गुरूमाली अण्णासाहेब मोरे आशिर्वादाने गुरूपुत्र नितीन भाऊ यांचे मार्गदर्शन खाली बाल संस्कार बरोबर मुलांना मोबाईल पासून दुर्लक्षीत करून त्याच्या आवडीनुसार विविध खेळ ,आनंदी ठेऊन अध्यात्मिक गोडी लागावी म्हणून नातवंडं पार्क मध्ये रेल्वे,बोटींग ची व्यवस्था करण्याचे नियोजन आहे.त्यासाठी सर्वानी सहकार्य करावे असे मत व्यक्त केले.
यावेळी उपनगराध्यक्ष शरदराव नवले,चंद्रकांत भारमल आणि मारुती लांघी यांनी आपले मनोगत व्यक्त करून नातवंड पार्क चा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे मत व्यक्त केले.
यावेळी सूत्र संचालन व आभार प्रदर्शन विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
यानंतर महिलांनी आ.डॉ.लहामटे यांना तिळगुळ वाटप करून शुभेच्छा दिल्या.
चौकट- यावेळी नातवंड पार्क मध्ये खेळण्यासाठी आलेल्या नात वंडाबरोबर फोटो काढण्याचा मोह आ.डॉ.किरण लहामटे यांना आवरता आला नाही.

