पुण्य वार्ता
शिंगणवाडी, अकोले तालुका: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंगणवाडी येथे विविध गुणदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेषतः गोळाफेक स्पर्धेत जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या विशेष सत्रात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी MH मराठीचे संपादक गणेश आवारी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष निवृत्ती पोकळे, तसेच मुख्याध्यापक कोकरे सर, संतोष घुले सर, लहू गांगड सर, गोरख गांगड सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिंगणवाडी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रामस्थ निंबा पोकळे, भास्कर खडके, जालिंदर पोकळे, सुरेश पोकळे, सिद्धांत सोनवणे, बच्चू पोकळे, रामा पोकळे यांनीही मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने आनंदाचे वातावरण होते. “अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते आणि शिक्षणाला चालना मिळते,” असे मत प्रमुख पाहुण्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
