पुन्य वार्ता
जुन्नर (प्रतिनिधी) –
स्पोर्ट्स आणि ट्रेकिंग क्षेत्रातील सर्व साहित्य एकाच छताखाली आणि माफक दरात उपलब्ध करून देणाऱ्या ‘स्वराज्य स्पोर्ट्स अँड ट्रेकिंग शॉप’ या नव्या व्यावसायिक उपक्रमाचे भव्य उद्घाटन रविवारी, दिनांक २९ जून रोजी जुन्नर येथे उत्साहात संपन्न झाले.
या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विश्वासराव आरोटे राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व संपादक, दैनिक समर्थ गांवकरी, प.पु. प.म. गोपीराज बाबा बिडकर अध्यक्ष, जुन्नर तालुका महानुभव परिषद, मा. श्री. देवरामशेठ डुकरे सरपंच, पारगांव मंगरुळ तसेच मा. श्री. ज्ञानदेवशेठ डुकरे प्रगतिशील शेतकरी यांच्या शुभहस्ते हा समारंभ पार पडला.
डॉ. विश्वासराव आरोटे यांचे उद्घाटन प्रसंगी मनोगत:
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गांवकरीचे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आपल्या भाषणात उपस्थितांना भावनिक आणि प्रेरणादायी शब्दांत उद्देशून म्हटले, “आज मला जुन्नर तालुक्यात येण्याचा योग आला आणि ही भूमी नेहमीच मला आध्यात्मिक आणि प्रेरणादायी वाटते. खरं तर असं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका समर्थ स्त्रीचा हात असतो. आजच्या या प्रसंगी आमच्या भगिनी मनिषा भालेकर ताईंनी सुरू केलेल्या ‘स्वराज्य स्पोर्ट्स अँड ट्रेकिंग शॉप’ या नव्या व्यवसायाचा उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न होणं ही माझ्यासाठी गौरवाची बाब आहे.”
ते पुढे म्हणाले, “शिक्षणाबरोबरच खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. या शॉपचे व्यवस्थापक म्हणून कार्यभार पाहणारे थोरात सर हे अतिशय कर्तव्यदक्ष, ज्ञानसंपन्न, धैर्यशील आणि नैसर्गिक ट्रेकिंगचा समृद्ध अनुभव असलेले व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ पुणे, नगर, नाशिक अशा तीन जिल्ह्यांतील खेळाडूंना मिळणार आहे. त्यांनी खेळासाठी लागणारे साहित्य माफक दरात उपलब्ध करून जनसेवा हीच ईश्वरसेवा हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवले आहे.”
“स्वराज्य शॉप केवळ व्यवसाय नसून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहे,” असे सांगून डॉ. आरोटे यांनी शॉपच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. “जिथे जिजाऊ माँ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिक्षण, शिस्त आणि शौर्याची शिकवण दिली, त्या पवित्र भूमीत हे शॉप सुरू होत आहे हे अत्यंत गौरवाचे आहे. यामुळे येथील युवकांना खेळाच्या क्षेत्रात अधिक संधी मिळतील आणि ते निश्चितच यशस्वी होतील,” असेही त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रसिद्धीप्रमुख नवनाथ जाधव, दैनिक समर्थ गांवकरीचे व्यवस्थापक संजय फुलसुंदर आणि इतर मान्यवर उपस्थित होते. “लवकरच या शॉपच्या संपूर्ण राज्यात शाखा सुरू होतील,” असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
शॉपमध्ये उपलब्ध साहित्यामध्ये –
सर्व प्रकारचे स्पोर्ट्स आणि ट्रेकिंग मटेरियल
टी-शर्ट व बॅचेस प्रिंटिंग
ट्रॉफीज्, ट्रॅकसूट, फोटो फ्रेम्स
रेनकोट, बॅग्स आदींचा समावेश आहे.
निमंत्रक कु. अनिकेत जनार्दन डुकरे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या व्यावसायिक उपक्रमासाठी सह्याद्री वाईल्डलाईफ ट्रेकर्स, स्वराज्य क्रिकेट अकॅडमी, सर्वज्ञ कन्स्ट्रक्शन कंपनी, बळीराजा हायटेक नर्सरी, श्री सिलिंग अॅन्ड इंटेरिअर, श्री मेडीकल पारगाव यांचा मोलाचा सहभाग आहे.
उद्घाटन सोहळा यशस्वीपणे पार पडल्याने सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी पुढील यशासाठी स्वराज्य स्पोर्ट्स अँड ट्रेकिंग शॉपच्या टीमला शुभेच्छा दिल्या.


