पुण्य वार्ता
अकोले(प्रतिनीधी)-रोटरी क्लबचे काम आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू आहे. सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य, पर्यावरण आदी विविध क्षेत्रात रोटरी आपले योगदान देत आहे. रोटरी क्लब हा सामाजिक बांधिलकी स्वीकारून विविध सामाजिक व विधायक उपक्रम राबवित आहे असे प्रतिपादन रोटरी क्लब अकोले सेंट्रल चे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
चास येथील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात चालू असलेल्या शिक्षण सप्ताहाचे औचित्य साधून रोटरी क्लब च्या वतीने विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सातपुते बोलत होते.
यावेळी रोटरी क्लब अकोलेचे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य, माजी अध्यक्ष सचिन शेटे,सेवा निवृत्त प्राचार्य तथा रोटरी सदस्य संतोष कचरे , सरपंच सौ.सुरेखाताई शेळके, माजी उपसरपंच बी एम शेळके,श्रीमती मंदाबाई शेळके,विद्यालयाचे प्राचार्य सुनील चौधरी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे बोलतांना विद्याचंद्र सातपुते म्हणाले की, आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन सात वर्षापूर्वी अकोले तालुक्यात रोटरी क्लब ची स्थापना झाली. त्या माध्यमातून अनेक सामाजिक व विधायक उपक्रम राबविले जात आहेत.गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी या उद्देशाने मोफत वह्या वाटप उपक्रम हाती घेतला आहे. रोटरीच्या या उपक्रमात समाजातील दानशूर व्यक्ती व ग्रामस्थांनीही सहभागी होऊन शाळेला मदत करावी असे आवाहन केले.
सरपंच सौ.सुरेखाताई शेळके यांनी शिक्षण सप्ताह उपक्रमास शुभेच्छा देत विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले आई, वडील,शाळा व गावाचे नाव रोशन करावे असे आवाहन केले.
प्रास्ताविक व स्वागत प्राचार्य सुनील चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन बी.एम. सद्गगीर यांनी केले तर आभार बी.बी. शेळके यांनी मानले.
