पुन्य वार्ता
अकोले (वार्ताहर) ता. ३
समाजात चांगल्या गोष्टी आपसूक घडत नाहीत त्या घडवून आणायला लागतात. त्या घडवून आणण्यासाठी काम करणारे वेगवेगळे लोक समाजात असतात. त्यांच्या कामाप्रती आदर व्यक्त करताना त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकत त्यांच्या कामाचे कौतुक झाल्यास त्यांच्या कामाला गती येते, बळ मिळते म्हणून चांगल्या कामाचं आणि ते करणाऱ्या माणसांचं कौतुक आजच्या काळात आवश्यक आहे . त्यातून इतरांनाही प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळते. देवठाण बीटने आयोजित केलेला गुणगौरव आणि सन्मान सोहळा उल्लेखनीय आहे, असे मत आमदार डॉ. किरण लहामटे यांनी व्यक्त केले.
अकोले पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या देवठाण बीटच्या वतीने विभागातील विद्यार्थी आणि शिक्षकांचा गुणगौरव सोहळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांच्या विकासासाठी धडपडणाऱ्या शालेय व्यवस्थापन समित्या आणि शासकीय शाळेत प्रवेश घेतल्यास ग्रामपंचायत कर माफ करणाऱ्या ग्राम पंचायत यांचा सन्मान सोहळा आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या उपस्थितीत थाटामाटात संपन्न झाला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर वाकचौरे, अगस्ती साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके, विस्तार अधिकारी माधव हासे, सविता कचरे, केंद्रप्रमुख सुनील नरसाळे, देवेंद्र आंबेटकर, दत्तात्रय आहेर, विविध गावचे सरपंच तसेच शालेय समित्यांचे अध्यक्ष, सदस्य याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. लहामटे यांनी या उपक्रमाची प्रशंसा करताना सांगितले की माणसाच्या आयुष्यात आणि समाजाच्या विकासात शाळा आणि शिक्षणाचे स्थान महत्त्वाचे आहे. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रशासनाने त्यांना मार्गदर्शन करायला हवे. शालेय व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि विविध पातळीवरील पदाधिकारी यांनी शाळांना भरीव सहकार्य केले पाहिजे. तालुक्यातील सर्व शाळांना इंटरऍक्टिव्ह पॅनेल बोर्ड, स्वच्छतागृहे वर्ग खोल्या आणि इतर भौतिक सोयीसुविधा पुरविण्यास प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे, गटशिक्षणाधिकारी अरविंद कुमावत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख बाळासाहेब आरोटे यांनी स्वागत केले. देवठाण बीटचे विस्तार अधिकारी अनिल गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका प्रस्ताविकाच्या भाषणात सांगितली. डी. डी. वाकचौरे यांनी सूत्रसंचालन केले. श्री . झंजाड यांनी आभार मानले. केंद्रप्रमुख स्वाती अडाणे, रोहिणी खतोडे विभागातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

