पुन्य वार्ता
ब्राम्हणवाडा: दि. १६ जुलै २०२५
अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावातील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, ब्राम्हणवाडा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवाडी येथील या दोन शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात आला.

कार्यक्रम शालेय आवारात अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. अध्यक्षस्थानी डॉ. विश्वासराव आरोटे हे स्वतः उपस्थित होते. यावेळी दैनिक समर्थ गांवकरीचे महाव्यवस्थापक श्री. संजय फुलसुंदर, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका सौ. परिघाताई आरोटे, छत्रपती आरोटे, सोनेरी आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ अकोले तालुका संपर्कप्रमुख श्री. संजय भाऊ गायकर, ब्राम्हणवाडा शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय दुरगुडे, शिक्षक श्री. सोपान हुलवळे, शिंदेवाडी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रशांत अभंग, शिक्षक श्री. युवराज धराडे, पालक प्रतिनिधी नवनाथ पवार, व समाजसेविका सौ. शारदाताई गायकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना दिले शैक्षणिक साहित्य:
या उपक्रमांतर्गत प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल, कंपास, इत्यादी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच शाळेला घड्याळ सुद्धा भेट देण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आत्मीयता वाढली असून, त्यांच्यात आत्मविश्वास आणि शालेय जीवनावरील प्रेम अधिक दृढ झाले आहे.

डॉ. विश्वासराव आरोटे यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन:
विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ. विश्वासराव आरोटे म्हणाले,
“विद्यार्थ्यांनी मेहनतीने शिक्षण घेतले पाहिजे. शिक्षण हेच व्यक्तिमत्व घडवते, संस्कार देते आणि यशस्वी जीवनाकडे घेऊन जाते. कोणतेही कार्य लहान नसते. प्रामाणिकपणे केलेले प्रत्येक कार्य समाज घडवण्याचे काम करते.”
त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असेही सांगितले की,
“भविष्यात कोणत्याही पदावर पोहोचलात तरी तुमच्या शाळेचे ऋण विसरू नका. पुन्हा एकदा शाळेत या आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटा – हीच खरी समाजसेवा आहे.”
त्यांनी पत्रकारिता, समाजसेवा आणि शिक्षण या तीन क्षेत्रांत नव्या पिढीने सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन केले.
एक विधायक संदेश देणारा उपक्रम:
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले असून, त्यांच्या शिक्षणात नवीन उर्मी निर्माण झाली आहे. शाळेतील शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनीही डॉ. आरोटे यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि असे उपक्रम नियमित व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.


