अकोले प्रतिनिधी-
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी विविध राजकीय पक्षांना आवश्यक असणाऱ्या विविध परवानग्या विहित वेळेत मिळण्यासाठी अकोले तहसील (नवीन इमारत) येथे सुविधा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, अकोले डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी दिली.
प्रचार फेरी, जाहीर सभा, चौक सभा यासह सर्व प्रकारच्या सभा व रॅलीची परवानगी पोलिस निरीक्षक, अकोले यांच्याकडून प्राप्त होणार आहे. परवानगीसाठी अर्ज व डी-१ नमुन्यात अतिरिक्त माहिती, नगर पंचायत जाहिरात लावण्याचे शुल्क व ना हरकत दाखला, तसेच अनुसूची १६ आवश्यक आहे. या सभेच्या ठिकाणी पोस्टर्स, झेंडे, कापडी बॅनर्स लावण्यासाठी नगर पंचायत व ग्रामपंचायत यांच्याकडून परवानगी देण्यात येणार आहे. परवानगीसाठीच्या अर्जासोबत खासगी जागा असल्यास मालकाचे संमतीपत्र व नगर पंचायत / ग्राम पंचायत जागा असल्यास परवानगी शुल्क भरल्याचा पुरावा आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. खासगी जागेतील जाहिरात फलकावर प्रचार साहित्य लावण्याची परवानगी नगर पंचायत व ग्रामपंचायत कार्यालयाकडून देण्यात येणार आहे. यासाठी अर्जासोबत मालकाचे संमतीपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा परवाना शुल्क भरल्याचा पुरावा, तसेच पोलिस ना हरकत दाखला जोडणे आवश्यक आहे.
हेलिपॅड व हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीची परवानगी अपर जिल्हादंडाधिकारी, अहिल्यानगर यांच्याकडून देण्यात येणार आहे. सभेसाठी ध्वनिक्षेपकाची परवानगी पोलिस विभाग, तर वाहनासाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी परवानगी दिल्यावर पोलिस निरीक्षक परवानगी देतील. शाळेच्या मैदानावर सभा घेण्यासाठीची परवानगी उपविभागीय दंडाधिकारी यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.
जाहिरात मजकुरासाठी परवानगी आवश्यक सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावर प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती, बल्क एसएमएससाठी माध्यम प्रमाणिकरण व संनियंत्रण समिती यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज व दोन प्रतीत जाहिरातीची संहिता, तसेच निर्मिती जिल्हास्तरीय समितीकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षात सादर करावा, असे जिल्हा निवडणूक शाखेने कळविले आहे.


