पुण्य वार्ता
शिर्डी – विधानसभेच्या आगामी निवडणुकीत जे पक्ष अथवा उमेदवार पत्रकारांचे प्रश्न उचलून धरतील व त्यांना उत्तर देण्यासाठी पुढाकार घेतील, त्या पक्षांच्याच पाठीशी पत्रकार उभे राहतील, असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी स्पष्ट केले आहे. शिर्डी येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने आयोजित दीपावली स्नेहभेट मेळाव्यात ते बोलत होते.
विशेष अतिथींची उपस्थिती,
या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री सुरेखा कुडची, बिग बॉस फेम संतोष (दादूस) चौधरी, भूमाता ब्रिगेड संस्थापक तृप्ती देसाई, समाज कल्याण न्यास संस्थापक डॉ. धर्मसेवक सोन्या पाटील, पालघर जिल्हा प्रमुख प्रकाश देवलीकर, रायगड संपर्कप्रमुख संतोष वस, राहाता संपर्कप्रमुख स्वप्निल शिंदे, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर पाटील, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संगमनेर तालुकाध्यक्ष संजय गोपाळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांसाठी दिवाळी भेट,
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या संकल्पनेतून दिवाळी सणाच्या निमित्ताने राज्यभरात पत्रकारांना एकत्र आणण्यासाठी विविध ठिकाणी स्नेहमेळावे आयोजित करण्यात येत आहेत. याच संकल्पनेचा एक भाग म्हणून शिर्डी येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकारांना दिवाळी भेट म्हणून विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले तसेच मिठाई वाटून दिवाळी गोड करण्यात आली.
संवाद यात्रेची फलश्रुती,
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने राज्यभर संवाद यात्रेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधण्यात आला. या यात्रेच्या निमित्ताने राज्य सरकारकडे अनेक मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. यामध्ये पत्रकार आणि वितरकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन व्हावे, अशी प्रमुख मागणी होती, जी राज्य सरकारने मान्य केली. राज्य सरकारमधील मंत्री चंद्रकांत दादा पाटील, मंगल प्रभात लोढा, आणि पंकजा मुंडे यांनी या मागणीसाठी विशेष प्रयत्न केले. संवाद यात्रेचे फलित म्हणून या महामंडळाला मंजुरी मिळाली आहे.
राजकीय भूमिका स्पष्ट,
या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ज्या पक्षांचे प्रतिनिधी, मंत्री, किंवा उमेदवार पत्रकारांच्या बाजूने उभे राहतील, त्यांचीच पाठराखण पत्रकार करतील असे डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सांगितले. पत्रकारांसाठी कार्य करणारे, त्यांच्या मागण्या मान्य करणारे पक्ष, उमेदवार हेच पत्रकार संघटनेच्या विश्वासात राहतील. पत्रकार संघाने या विधानामध्ये स्पष्ट भूमिका घेतली आहे की, निवडणुकीमध्ये त्यांच्या समस्यांना कंठ देणाऱ्या पक्षांना त्यांनी पाठींबा द्यावा.
कार्यक्रमातील पत्रकारांची उपस्थिती,
या कार्यक्रमात शिर्डीतील अनेक पत्रकार उपस्थित होते, ज्यात सिताराम चांडे, रामकृष्ण लोंढे, दिलीप खरात, राहुल फुंदे, आणि संजय महाजन यांचा समावेश होता.



