पुण्य वार्ता
अकोले(प्रतिनीधी)-अकोले तालुक्यातील पत्रकारांनी जागविल्या. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या आठवणी सर्वच पत्रकार भरभरून बोलले. असा नेता पुन्हा होणे नाही अशी भावना अनेकांनी व्यक्त केली.
राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री व ज्येष्ठ नेते दिवंगत मधुकरराव पिचड यांचे अलीकडेच दुःखद निधन झाले. अकोले तालुक्याच्या विकासात मोठे योगदान देणाऱ्या आणि आदिवासींचे अनेक प्रश्न मार्गी लावणाऱ्या त्यांच्या विकासाला दिशा देणाऱ्या स्व. मधुकरराव पिचड यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
अकोले तालुक्यात पाणी अडविण्याच्या माध्यमातून त्यांनी जे न भूतो ते काम केले असा आवर्जून उल्लेख करताना जलनायक असा त्यांचा उल्लेख केला. मागील तीस वर्षात अहमदनगर जिल्ह्यात अकोल्याचा अपवाद वगळता एकही धरण झाले नाही, अकोले तालुक्यात मात्र स्वर्गीय पिचडां मुळे एक डझनभर धरणे बांधली गेली. हे शक्य झाले ते केवळ स्वर्गीय पिचड यांची प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि त्यांचे प्रशासकीय कौशल्य यामुळेच.
निळवंडे धरणाच्या निर्मितीतील त्यांचे योगदान लक्षात घेऊन धरणाला स्वर्गीय लोकनेते मधुकरराव पिचड यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्ते वीज पाणी याबाबत स्वर्गीय पिचड यांनी गेलेल्या शाश्वत स्वरूपाच्या कामाचा फायदा तालुक्यातील भावी अनेक पिढ्यांना होत राहणार आहे. अकोले तालुक्यातील विरोध संपविण्याचे प्रयत्न त्यांनी कधीही केले नाही. पत्रकारांनी अनेक वेळा त्यांच्या विरुद्ध लिखाण केले, मंत्री असताना त्यांनी पत्रकारांबद्दल काढलेल्या काही उद्गारांबद्दल पत्रकार संघाने त्यांचा जाहीर निषेध केला होता पण तरीही पत्रकारांना त्रास देण्याचे काम त्यांनी कधीही केले नाही. तालुक्यातील विरोधी आवाज आणि विचार स्वातंत्र्य जपण्याचे काम करतानाच त्यांनी लोकशाहीचा नेहमीच सन्मान केला. अशा आशयाची ज्येष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर, भाऊसाहेब मंडलिक,अमोल वैद्य, शांताराम काळे,हेरंब कुलकर्णी, भाऊसाहेब चासकर, सागर शिंदे, डॉ.विश्वासराव आरोटे ,हेमंत आवारी, प्रकाश आरोटे,रमेश खरबस,
सुनील गीते, हरिभाऊ फापाळे, भाऊसाहेब वाकचौरे, संदीप दातखिळे आदी. पत्रकारांनी मनोगते व्यक्त करत स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी उगले यांनी ६० वर्षाहून अधिक काळ राजकीय, सामाजिक जीवनात स्वर्गीय मधुकर पिचड यांचा संपर्क आला. राजकीय दृष्ट्या आमचे कधी पटले नाही पण त्यांनी कधीही संबंधात कटूता येऊ दिली नाही, अशा उंचीचा माणूस होणे नाही असे सांगतानाच स्व. पिचड यांची अभिवादन सभा आयोजित करून पत्रकारांनी जी संवेदनशीलता दाखवली त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
अभिवादन सभेच्या प्रास्ताविकात
श्रीनिवास रेणुकदास यांनी स्व.पिचड यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. चंद्रशेखर हासे यांनी आभार मानले.
नुकतेच निधन पावलेले देशदूत सार्वमत चे संस्थापक देवकिसन सारडा यांना शेवटी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी गणेश आवारी, नंदकुमार मंडलिक,अशोक उगले,आबासाहेब मंडलिक,अमोल शिर्के,भाऊसाहेब साळवे,प्रकाश महाले,राजू जाधव,विलास तुपे, नरेंद्र देशमुख,, भारत रेघाटे,अल्ताफ शेख,प्रशांत देशमुख,प्रवीण धुमाळ,संजय शिंदे, प्रदीप कदम
राजेंद्र उकिर्डे, सचिन लगड,साहित्यिक प्रा.डॉ.सुनिल शिंदे,
भाऊसाहेब कासार,आर.पी.आय.चे तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे,आदींसह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


