पुण्य वार्ता
मुख्य संपादक अशोक उगले
पंचक्रोशीत किंबहुना तालुक्यात आपल्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या डोंगरगावच्या नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणारा कृष्णा संदिप पवार या विद्यार्थ्याने महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली, अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स फेडरेशनच्या वतीने लोणी(प्रवरानगर) येथील पब्लिक स्कूलमध्ये झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धांमध्ये भाग घेतला. नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी कृष्णा संदीप पवार याने या स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत “ट्रायथलॉन” या क्रीडा प्रकारात जिल्ह्याच्या सर्व शाळेंतील स्पर्धकांना मागे टाकत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला. कृष्णा संदिप पवार या विद्यार्थ्यांने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये आपल्या शाळेचे आणि गावाचे नाव कोरले ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. आता त्याची बालेवाडी(पुणे) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्याच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे विद्यालयाच्या प्रांगणात त्याचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी विद्यालयाचे संस्थापक तथा सेक्रेटरी विठ्ठल भाऊ उगले, अध्यक्ष एकनाथ गोर्डे, मुख्याध्यापिका श्रीमती. संगिता हासे, क्रीडा शिक्षक व कृष्णा पवारचे गुरु शशिकांत कातोरे नेताजी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, तसेच डोंगरगांवचे सरपंच दशरथ उगले, उपसरपंच अमोल उगले, तंटामुक्ती अध्यक्ष सुनिल उगले, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर उगले शाळेचे माजी विद्यार्थी गजानन उगले, सुभाष शिंदे तसेच अनेक पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांनी कृष्णा पवारचे त्याने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले तसेच आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. डोंगरगावमधील सर्व संस्था, नेताजी विद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच सर्व डोंगरगाव ग्रामस्थांकडून कृष्णा पवारचे अभिनंदन होत आहे.

