पुण्य वार्ता
अकोले, प्रतिनिधी:
भंडारदरा येथील शेंडी गावात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कार्यरत असलेल्या आदिवासी उन्नती सेवा मंडळ, राजूर संचलित व शासनमान्य अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, शेंडी येथे नव्या वस्तीगृहाचे भूमिपूजन व विविध गुणदर्शन सोहळा उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित निवास सुविधा मिळणार असून शिक्षणाची गुणवत्ता अधिकाधिक उंचावेल.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रसंत परम पूज्य गुरुवर्य डॉ. ज्ञानेशानंद शास्त्रीजी महाराज होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये विश्वविभूषित ज्येष्ठ समाजसेवक प.पू. डॉ. नानजीभाई ठक्कर (ठाणावाला), लक्ष्मीपुत्र गणेश दादा भांड साहेब, माजी आमदार वैभव भाऊ पिचड, डॉ. हेमलता ताई पिचड, तसेच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक ‘समर्थ गांवकरी’चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांचा समावेश होता.

वस्तीगृह भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शन सोहळा उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या वेगवेगळ्या वेशभूषा, पारंपरिक नृत्ये, शौर्यगाथा, ऐतिहासिक व्यक्तिरेखांची सजीव सादरीकरणे यामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक आणि शैक्षणिक रंग लाभला. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी डॉ. नानजीभाई ठक्कर यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे विचार मांडले. त्यांनी सांगितले की, “आपल्या परिस्थितीला शाप न समजता तीच संधी मानून पुढे वाटचाल करावी. शिक्षण हेच खरे शस्त्र आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.

वैभव पिचड यांनी वस्तीगृहाच्या गरजेवर प्रकाश टाकत सांगितले की, “गिरिप्रदेशातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत हे वस्तीगृह ही मोठी सुविधा ठरणार आहे. येथील शिक्षण व्यवस्थेला आणखी बळ मिळेल.”
डॉ. विश्वासराव आरोटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यशस्वी होण्यासाठी लागणाऱ्या शिस्त, अभ्यासाची एकाग्रता व सकारात्मक दृष्टिकोन याचे महत्त्व अधोरेखित केले. “संघर्षाची तयारी असेल तर यश तुमच्या पायाशी लोळण घेतं,” असे ते म्हणाले.

कार्यक्रमास गावकरी, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि शाळा समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, कर्मचारी व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून त्यातून त्यांना नवे स्वप्न, नवी दिशा आणि आत्मविश्वास लाभला आहे.

*शहरी व ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था दिवसेंदिवस प्रगती कडे जात असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देण्याचे खरे काम राज्यांमध्ये माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांनी केले त्यांचा आदर्श घेऊन त्यांचे सुपुत्र वैभव पिचड हे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी आदिवासी उन्नती सेवा मंडळ या संस्थेच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या सर्व ग्रामीण भागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक व आश्रम शाळांना जे कार्य करत आहे ते कार्यवाखान्याजोगे आहे यासाठी मी सदैव सर्वांना मदत करण्यास प्रयत्नशील राहील असे आव्हान* हिंदुस्थानातील नामवंत उद्योजक तथा थोर समाजसेवक नानजीभाई ठक्कर ठाणावाला यांनी काल शेंडी येथे आदिवासी उन्नती सेवा मंडळाच्या अनुदानित प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेच्या वस्तीगृह भूमिपूजन प्रसंगी बोलताना व्यक्त केले.*
