पुन्य वार्ता
अकोले – आज जीवनात सुख, आनंद आदी मिळविण्याचे साधन बदलले मात्र शॉर्टकट सुखाच्या नादात आपण आपला आत्मविश्वास, स्वाभिमान, शौर्य आणि जिद्द याला विसरून सोशल मीडियाच्या मायाजालात अडकून पडले असल्याने त्यातून बाहेर पडून शिवचरित्राचे धडे गिरवावेत व समृद्ध जीवन करण्याचे आवाहन शिवचरित्राचे अभ्यासक कवी डॉ. निलेश चव्हाण यांनी केले.
थोर स्वातंत्र्यसैनिक गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी तथा बाबा यांच्या 15 व्या स्मृतिदिनानिमित्त कळसेश्वर विद्यालय कळस बु येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगी केशव बाबा चौधरी हे होते. संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैलेजा पोखरकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
डॉ. चव्हाण पुढे म्हणाले, विद्यार्थी वर्ग प्रचंड अनुकरणीय असतो , उगीचच एखाद्या चित्रपटाचे गीत गाण्यापेक्षा शिवरायांच्या पराक्रमाचे गीत किंवा पोवाडे गाऊन त्यांच्या आदर्श गुणांचे पालन आपल्या जीवनात करून जीवन आनंदी व सुखी करावे. राजमाता जिजाऊ, राजे शहाजी यांच्यासारखे माता पिता होऊन प्रत्येक घरात शिवबा जन्माला आला अन आदर्श समोर ठेऊन आपण जीवनाची वाटचाल केली तर या देशात कधीच बलात्कार, अत्याचार होणार नाहीत. शिवरायांचे स्वप्न स्वराज्य स्थापन करण्याचे होते. आपल्या प्रत्येक आक्रमणात नवनवीन प्रयोग तंत्र वापरून शत्रुलाही धोबीपछाड करण्याचे कसब त्यांचेकडे होते. अविश्रांतपणे सतत स्वराज्याची घडी बसविण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. माणसे ओळखण्याची हातोटी , आत्मविश्वास, जिद्द, रयतेवरील प्रेम, स्वच्छ चारित्र्य , परधर्माचा आदर आदी त्यांचे गुण आपल्या जीवनात अंगीकारन्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
अगस्ती एजुकेशन संस्था गुरुवर्य बा. ह. नाईकवाडी या शिक्षकाने स्थापन केली. एक शिक्षक इतक्या सुंदर पध्दतीने संस्था विकसित करू शकतो याचे हे दुर्मीळ उदाहरण आहे. ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ हे बोध वाक्य घेऊन संस्था स्थापन केलेल्या बाबांनी कर्म करण्यावर अधिक भर देत कधीच फळाची अपेक्षा केली नसल्याने इतक्या वर्षानंतरही संस्था, परिवार , सर्व कर्मचारी मोठ्या उत्साहात त्यांचा हा स्मृतिदिन विचारांचा जागर करून साजरा करत असल्याबद्दल कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात योगी केशव बाबा चौधरी यांनी नाईकवाडी बाबांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्तविक भाषणात संस्थेचे कार्याध्यक्ष सतीश नाईकवाडी यांनी सांगितले की, नायकवाडी बाबा कठोर स्वभावाचे होते, अकोले एजुकेशन संस्था व अगस्ती एजुकेशन संस्था ची स्थापना करून तालुक्यात शिक्षणाची दारे बहुजनासाठी उघडली.
याप्रसंगी कार्याध्यक्ष शिरीष नाईकवाडी, संदीप नाईकवाडी, कारभारी उगले, सुरेश गडाख, सोन्याबापू वाकचौरे, सरपंच राजेंद्र गवांदे, भाऊसाहेब वाकचौरे, ईश्वर वाकचौरे, अण्णासाहेब ढगे, पत्रकार विजयराव पोखरकर, हेमंत आवारी, भानुदास पोखरकर, सरपंच दीपाली चासकर, संस्थेच्या सर्व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्वं शिक्षक शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचारी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत कळसेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नंदा बिबवे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सतीश पाचपुते यांनी करून दिला. सूत्रसंचालन हरिष आंबरे यांनी तर आभार पर्यवेक्षक संजय शिंदे यांनी मानले शेवटी पर्यवेक्षक मंगेश खांबेकर यांनी पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
