पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी)-सरस्वती विद्यालय व
ज्युनिअर कॉलेज, धामणगाव पट शाळेतील ज्येष्ठ शिक्षक राजीव अरुणा उत्तमराव देशमुख हे 33 वर्ष विज्ञान शिक्षक म्हणून आपली सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. त्यांचा सेवापूर्ती समारंभ अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा. सिताराम पाटील गायकर यांच्या अध्यक्षतेखाली व अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मधुकरराव नवले, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. सुनील दातीर, सेक्रेटरी मा. सुधाकरराव देशमुख व स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा. सुधाकर आरोटे, अगस्ती नागरी पतसंस्थेचे चेअरमन मा. अशोकराव देशमुख, योगी केशव महाराज, ड्वार्फ केटल या संस्थेचे सीएसआर फंड प्रमुख संतोष जगधने, सौ नताशा जगधने, विद्यालयाचे प्राचार्य शिवराम भोर यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. प्रथम सर्व मान्यवरांच्या हस्ते शाळेतील संगणक प्रयोग शाळेचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य शिवराम भोर यांनी कार्यक्रमाचे प्रयोजन स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. सरांचे चिरंजीव ॲड. आशिष देशमुख यांनी आपल्या वडिलांप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या. राजीव देशमुख व त्यांच्या पत्नी डॉ. जयश्री देशमुख व सरांचे वडील उत्तमराव देशमुख यांचा शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. सरस्वती विद्यालय धामणगाव पाट शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, सर्व पालक तसेच शाळेचे माजी विद्यार्थी, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, मित्र, आप्तेष्ट, स्नेहीजन कार्यक्रमाला उपस्थित होते. राजीव देशमुख सर यांची सेवापूर्ती म्हणजे केवळ एक मेकॅनिकल प्रोसेस आहे. कारण शिक्षक हा कधीही निवृत्त होत नाही. राजीव सरांनी सेवापूर्तीच्या ऊर्जेतून नवीन उपक्रम हाती घ्यावेत असे प्रतिपादन अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मधुकरराव नवले यांनी केले. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी सुधाकर आरोटे यांनी राजीव देशमुख सर यांनी तीस वर्ष सरस्वती विद्यालय धामणगाव पाठ एकाच विद्यालयात अतिशय सेवाभावी वृत्तीने व निष्ठापूर्वक शिक्षक म्हणून काम केले व ही शाळा नावारूपाला आणली. त्यांच्याच प्रयत्नामुळे आज या शाळेत विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रयोगशाळा उभी राहिली असे म्हणत त्यांचे कौतुक केले. मा. सिताराम पाटील गायकर यांनी देखील आपल्या अध्यक्षीय भाषणातून श्री संतोष जगधने यांच्या प्रति ऋण व्यक्त केले व राजीव देशमुख सरांच्या सेवाभावी वृत्तीचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. राजीव देशमुख सर यांनी विज्ञान शिक्षण देता देता विद्यार्थ्यांना संगणकाचे शिक्षण दिले व संगणक प्रयोगशाळा शाळेत उपलब्ध करण्यासाठी व विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले व त्यासाठी त्यांना विद्यालयातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व संस्थेचे विश्वस्त मंडळ यासाठी यांनी प्रोत्साहन दिले व सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या पत्नी अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. जयश्री देशमुख यांनी सर्व विद्यार्थी, पालक, अतिथी व उपस्थित मान्यवरांच्या प्रती आपल्या परिवाराच्या वतीने ऋण व्यक्त केले. स्वाती गोसावी मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रतिभा कडलग यांनी सन्मान पत्राचे वाचन केले व प्रमिला आवारी यांनी आभार व्यक्त केले. विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

