पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- ज्यांच्याकडे कौशल्य आहे तेच युवक जीवनात यशस्वी झाल्याचे सांगत सर्वांनी आपापल्या क्षेत्रात पारंगत रहावे असे प्रतिपादन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सेवा निवृत्त प्राचार्य तथा रोटरी क्लब चे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये15 जुलै जागतिक कौशल्य दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी प्रभारी प्राचार्य अरुण भालेराव, निदेशक संदीप देशमुख, पुरुषोत्तम नवले,भास्कर वैद्य,बाबासाहेब धुमाळ, निलेश थटार, श्री.वाकचौरे,भरत धुमाळ आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्री .सातपुते पुढे म्हणाले की, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थी हे औद्योगिक क्षेत्राचा महत्वपूर्ण घटक असून त्यांच्या कडे असलेल्या कौशल्यावर ते जीवनात यशस्वी होत आहे.विद्यार्थ्यांनी अनुभव म्हणून व अधिकचे कौशल्य प्राप्त करण्यासाठी काही वर्षे नोकरी करावी मात्र पुढे नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरु करावा. विद्यार्थ्याना कौशल्याचे महत्व समजण्यासाठी व त्यांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी जगभरात जागतिक कौशल्य दिन साजरा होत आहे.आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कौशल्य प्राप्त व्हावे म्हणून शासन प्रत्येक महाविद्यालयामध्ये कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करीत आहे.कौशल्य हे प्रत्येक छोट्या छोट्या बाबीमध्ये गरजेचे झाले असून कौशल्य प्राप्त विदयार्थ्यांचेच भविष्य उज्वल असणार असल्याचे स्पष्ट केले.विद्यार्थ्यांना अनेक घटनाप्रसंग सांगून कौशल्याचे महत्व पटवून दिले.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बुके देऊन सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक प्र.प्राचार्य अरुण भालेराव यांनी केले तर सूत्रसंचालन निदेशक निलेश थटार यांनी केले.आभार निदेशक संदीप देशमुख यांनी मानले.



