पुण्य वार्ता
अकोले, (प्रतिनिधी) –अभिनव शिक्षण संस्था,अकोले संचलित वसुंधरा अकॅडेमीचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ चा उद्घाटन सोहळा जल्लोषात संपन्न झाला. अकोले पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मा. मोहन बोरसे यांच्या शुभहस्ते व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांच्या अध्यक्षतेखाली या क्रीडा महोत्सवाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. विद्यार्थ्यांमधील क्रीडाकौशल्यांना वाव देण्यासाठी दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. पोलीस निरीक्षक मा. मोहन बोरसे यांच्या हस्ते क्रीडा ध्वजाचे आरोहण करण्यात आले. त्यांनतर यश चौधरी, सार्थक नवले व स्नेहल शेटे या विद्यार्थ्यांनी आणलेली क्रीडाज्योत मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धांचे उद्घाटन झाले. यानंतर वसुंधरा अकॅडेमीच्या सफायर द ब्लू, एमराल्ड द ग्रीन, रुबी द रेड व डायमंड द येलो या चारही हाऊसने परेड कमांडर ज्ञानेश्वरी आरोटेच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट परेड संचालन करत कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्यांनतर हेड गर्ल आर्या घाणे व हेड बॉय अर्णव चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली सर्व कॅप्टन्स, प्रिफेक्ट्स व विद्यार्थी यांनी क्रीडा प्रतिज्ञा घेतली. अभिनव शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा तथा शाळेच्या प्राचार्या डॉ. जयश्री देशमुख यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व विद्यार्थ्यांनी क्रीडा महोत्सवात सहभागी होऊन या स्पर्धांचा आनंद घ्यावा असे संबोधित करत सर्वांना क्रीडा स्पर्धेच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी वसुंधरा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत, समूहनृत्य, तसेच योग प्रात्यक्षिके सादर करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी प्रमुख अतिथी मा. मोहन बोरसे आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले विविध खेळ खेळल्याने संघकार्य, नेतृत्व, जबाबदारी, संयम आणि आत्मविश्वास यासारखी जीवन कौशल्ये आत्मसात करण्यास मदत होते आणि जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपण समर्थ होतो . आजच्या युगात क्रीडाक्षेत्रातही करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. शाळेत अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे जेणेकरून विद्यार्थी आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व ऑलिम्पिक सारख्या खेळांमध्ये करतील व भारताचा नावलौकिक वाढवतील. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर नवले यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनातील ध्येय साध्य करण्यासाठी त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर काम करण्याची संधी या क्रीडास्पर्धेतून मिळत असते. व्यक्तिमत्व घडवण्यात मैदानी खेळांचे आत्यंतिक महत्व आहे. आत्मसात केलेले कौशल्य दाखवण्याची संधी खेळाडूंना स्पर्धेतून मिळते .खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो तसेच मानसिकताही प्रबळ बनते असे प्रतिपादन करत विद्यार्थ्यांना क्रीडास्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अभिनव शिक्षण संस्थेच्या सहसचिव तथा प्राचार्या अल्फोन्सा डी व अभिनव प्री-स्कूल च्या प्राचार्या राधिका नवले, पालक , विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजक म्हणून इंद्रभान कोल्हाळ यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी खूप मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता सोलापुरे, अनन्या वणवे व कस्तुरी राऊत यांनी केले तर स्नेहा दुर्गुडे यांनी उपस्थितांच्या प्रती ऋण व्यक्त केले.

