पुन्य वार्ता
अकोले (प्रतिनिधी) – अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या अकोले विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते आणि प्रगतशील शेतकरी गंगाराम पुंजा धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कापसे यांनी ही माहिती दिली.
या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी धुमाळ यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. निवडीच्या वेळी ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पानसरे यांनी त्यांच्या नावाची सूचना मांडली, तर ज्येष्ठ संचालक अनिलराव गायकवाड यांनी अनुमोदन दिले. निवडणूक प्रक्रियेला संचालक वसंतराव धुमाळ, सुधाकर नवले, दिलीप गोर्डे, विजय पवार, दिनकर जगताप, संचालिका श्रीमती रंजना मंडलिक, निर्मला नाईकवाडी आदी उपस्थित होते.
निवडीनंतर बोलताना गंगाराम धुमाळ यांनी सर्व संचालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, अकोले विविध कार्यकारी सेवा सोसायटी पंचक्रोशीतील सर्वात मोठी संस्था असून, संस्थेच्या माध्यमातून स्वस्त धान्य, खते, औषधे विक्रीसह शेतकऱ्यांच्या हिताचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. संस्थेच्या मालकीचे अनेक ठिकाणी गाळे आहेत तसेच सणासुदीच्या वेळी सभासदांना लाभांश (डिव्हिडंड) वाटप केले जाते. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून शेतकरी व सभासदांच्या आर्थिक विकासासाठी विविध नवीन प्रकल्प हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
धुमाळ यांच्या या निवडीबद्दल अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सहकार महर्षी सिताराम पाटील गायकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अमित भांगरे भाजप नेते शिवाजीराजे धुमाळ, मच्छिंद्र धुमाळ यांसह अनेक मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
