पुण्य् वार्ता
अकोले : –
मुलांच्या आयुष्याचा पहिला पाया हा जिल्हा परिषद शाळेतून घडतो, जगायचे कसे हे शाळाच शिकविते म्हणून तर आयएएस व आयपीएस अधिकारी हे सर्वाधिक जिल्हा परिषद शाळेतून घडतात. मात्र मंदिर, यात्रा आणि सप्ताह यांना लाख आणि कोटीत वर्गणी मिळते परंतु शाळेला वीस ते पंचवीस रुपये दिले जातात. आनंद या गोष्टीचा आहे की, उंचखडक बु शाळेसाठी गावकर्यांनी लाखो रुपयांची वर्गणी जमा करुन शाळा महाराष्ट्राच्या नकाशावर नेली आहे. म्हणून जेवढं मंदिराला भजले जाते तितकेच झेडपी शाळेंना देखील महत्व दिले पाहिजे असे प्रतिपादन आ. सुरेश अण्णा धस (आष्टी विधानसभा मतदारसंघ बीड) यांनी केले. ते उंचखडक बु येथे काळभैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. आ. वैभवराव पिचड होते तर व्यसपिठावर संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ, रिपाइंचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे, विष्णुपंत चव्हाण, भाऊमामा खरात, सुनिल दातीर, सुधाकर देशमुख उपस्थित होते.

सुरेश धस म्हणाले की, उंचखडक बु हे एक आदर्श गाव आहे, येथे प्रभुरामचंद्रांचे वास्तव्य लाभले आहे, गावातून अनेक मुले स्पर्धा परिक्षेतून यशस्वी झाले आहेत, गावची शाळा, मंदिरे व शेती उन्नत झाली आहे, हजारोंच्या संख्येची उपस्थित पाहून गावचा एकोपा दिसतो आहे. त्यामुळे काळभैरवनाथ यात्रेच्या निमित्ताने जो यशस्वी विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक यांचा सन्मान केला तो एक आदर्श उपक्रम आहे. ज्या ज्या व्यक्तींचा सन्मान झाला ते सर्व जिल्हा परिषद शाळेतून शिकून मोठे झाले आहेत, त्यामुळे प्रत्येकाने मराठी शाळा आणि आपली मातृभाषा जपली पाहिजे, आजकाल इंग्रजी माध्यमांचे फॅड सुरु आहे, कोणीही उठून इंग्रजी शाळा काढू लागले आहे, कसलीही परवानगी नाही की सुविधा नाही एक टमटम घ्यायची आणि त्यात मुलं कोंबायची, सुटाबुटात मुलं, रेन रेन कम अगेन म्हटलं की झाले इंग्लिश मीडियमचे मुलं, आई बाप काबाड कष्ट करुन त्यांची फी भरतात, अवघ्या दहा ते बारा हजार रुपयांवर काम करणारा शिक्षक त्या मुलांना काय शिकवणार आहे? त्यामुळे, मराठी शाळा वाचल्या पाहिजे हे पालकांनी समजून घेतले पाहिजे असे धस म्हणाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना ते म्हणाले की, मी घटनेनंतर देशमुख कुटुंबाला भेट दिली होती, तेथे संतोषला कसे मारले याचे वर्णन तेथे मी ऐकले आणि माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. तेव्हाच मी ठरविले होते की काय होईल ते होईल पण ही गुन्हेगारी प्रवृत्ती येथेच गाडली पाहिजे तेव्हा हा लढा तिव्र झाला आणि तो जनतेने हाती घेतला. संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी अखेरच्या घटकेपर्यंत संघर्ष करत राहणार आहे असे धस म्हणाले. यावेळी सायंकाळी ४ वाजता जंगी कुस्त्यांचा कार्यक्रम पार पडला त्यासाठी अंतरराष्ट्रीय कुस्तीपट्टू पदक विजेते तान्हाजी नरके, बबलु धुमाळ, बाबासाहेब नाईकवाडी यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. सागर शिंदे, सोपान देशमुख, आबासाहेब मंडलिक, संदिप दातखिळे, राहुल देशमुख, शैलेश देशमुख, विजय देशमुख, विशाल देशमुख, सागर देशमुख, महेश खरात, रविंद्र देशमुख, अनिल देशमुख, विकास खरात, निखील खरात, महेश जेजुरकर, तुषार देशमुख, प्रतिक मंडलिक, भाऊसाहेब देशमुख, रवि रुपवते, श्यामराव देशमुख, अमोल शिंदे, गणेश खरात, अक्षय देशमुख यांच्यासह काळभैरवनाथ यात्रा कमिटीच्या सर्व आयोजकांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. सागर शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन सोपान देशमुख यांनी केले व आभार भाऊमामांना खरात यांनी मांडले.

