पुण्य वार्ता
अकोले– आजच्या काळात बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपल्या शेतात करून शाश्वत शेती उत्पादन घेणे ही काळाची गरज आहे, त्यानुसार नवनवीन तंत्र आत्मसात करून सेंद्रिय पदार्थांचाही आपल्या शेतीमध्ये अवलंब करावा असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाचा शेती मित्र व कृषी भूषण पुरस्कार प्राप्त प्रयोगशील शेतकरी सयाजीराव पोखरकर यांनी माणिक ओझर तालुका अकोले येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना केले .महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .अकोले येथील महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग पंचायत समिती अकोले आणि वॉटर शेड ऑर्गनायझेशन या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात शेतकरी मेळाव्यात कृषिभूषण सयाजीराव पोखरकर बोलत होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी श्री. अशोक साळी होते व्यासपीठावर गटविकास अधिकारी श्री विकास चौरे ,मंडल कृषी अधिकारी बाळासाहेब बांबळे ,सरपंच श्री. बोटे ,अकोले मंडळ कृषी अधिकारी रवींद्र रोकडे, समशेरपूर मंडळ कृषी अधिकारी राजेंद्र बिन्नर, राजूर मंडळ कृषी अधिकारी यशवंत खोकले,आत्माचे प्रमुख श्री. बाळनाथ सोनवणे, कृषिभूषण गंगाराम धिंदळे ,शेतीनिष्ठ शेतकरी शांताराम बारामते( धामणवन) आदी. मान्यवर उपस्थित होते. शेतीला आधुनिकतेची जोड देताना सेंद्रिय पदार्थांचे आपल्या शेतात विघटन करून त्याचा अवलंब करणे ,नवनवीन जातींची लागवड, चार सूत्री भात लागवड, युरिया ब्रिगेड चा वापर, परसबाग, बांधावरील फळबाग लागवड या बाबींचा अवलंब करून उत्पादन वाढवून आपल्या जीवनात खऱ्या अर्थाने शाश्वती आणि स्थैर्य निर्माण करावे, असेही श्री. पोखरकर यांनी सांगितले .तालुका कृषी अधिकारी श्री. अशोक साळी यांनी शासकीय पीक विमा योजना, अवर्षण परिस्थितीमध्ये पीक नियोजन याबाबत विवेचन करताना शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घेण्याचे आवाहन केले.क्रुषि संजीवनी पंधरवाडा साजरा करण्याचे उपक्रम व उद्देश श्री. साळी यांनी स्पष्ट केला .राजूर मंडळ कृषी अधिकारी यशवंत खोकले यांनी विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती दिली. तर गटविकास अधिकारी श्री. विकास चौरे यांनी रासायनिक खतांचे दुष्परिणाम आणि पारंपारिक शेती पद्धतीतील सुधारणा याबाबत महत्व विषद केले .यावेळी कृषिभूषण गंगाराम धिंदळे, शेतीनिष्ठ शेतकरी शांताराम बारामते यांनी आपापले अनुभव कथन केले .महिला शेतकरी श्रीमती कदम. सौ. सत्यभामा बोठे यांनी चर्चेत सहभाग घेतला. यावेळी सी. आर. ए .तंत्रज्ञानानुसार आंबा लागवडीचे प्रात्यक्षिकही उपस्थितांना दाखविण्यात आले .मान्यवरांचे हस्ते शेतकरी व महिलांना केशर आंब्याची कलमे/ रोपे व लिंबोणीची रोपे यावेळी भेट देण्यात आली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माचे प्रमुख श्री. बाळनाथ सोनवणे यांनी केले .कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी कृषी पर्यवेक्षक साहेबराव वायाळ ,मीनानाथ गभाले ,राजाराम साबळे ,वॉटर शेडच्या हासे मॅडम, धिंदळे मॅडम यांच्यासह सर्व कृषी सहाय्यक तसेच कर्मचाऱी यांनी विशेष परिश्रम घेतले.
