पुन्य वार्ता
राजूर/ प्रतिनिधी -(सचिन लगड )
अकोले
तालुक्यातील अतिदुर्गम घाटघर, उडदावणे, पांजरे परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असते. इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांत वस्तीवरून विद्यार्थी येत असतात. जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे अनेकदा शाळेत येताना मुले अर्धओली होतात. दप्तरही भिजते. कधी कधी शाळाही बुडते. लहान मुलांच्या शाळेतील उपस्थितीची व शिकण्यातील अडचण ओळखत पुणे स्थित अप्रोच हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन व रामनारायणजी बुब मेमोरियल ट्रस्ट संगमनेर या संस्थांच्या वतीने घाटघर, उडदावणे, पांजरे, शिंगणवाडी, राजवाडा, मुरशेत, बांगरवाडी, धारवाडी व परिसरातील वीस शाळांतील सहाशे विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले.
मुलांना नवे कोरे रेनकोट मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. दूरवरून शाळेत येताना मुलांना रेनकोटचा निश्चित फायदा होणार आहे. रेनकोट मुळे शाळेत मुलांची उपस्थिती नियमित असेल असे वाटपावेळी बोलताना पालकांनी सांगितले.
ग्रामीण भागातील मुलांना शाळेची गोडी लागावी शिकण्यातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून संस्थेने स्थानिक शिक्षकांशी संपर्क करत मुलांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षी रेनकोट दिल्याचा चांगला फायदा झाल्याचे यावर्षी पुन्हा रेनकोट वाटप करण्यात आले. रेनकोट साठी रामनारायणजी बुब ट्रस्ट संगमनेरचे अशोक बुब, कृष्णकुमार बुब यांचे आर्थिक सहकार्य मिळाल्याचे पायल मजुमदार यांनी सांगितले. परिसरातील शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना रेनकोट उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या भावना रांका, प्रवीण मुजुमदार, विजय पाळेकर, संकेत खाडे, उत्कर्ष केळकर, भानुदास आभाळे, गणपत सहाणे, भाऊसाहेब कासार, नामदेव सोंगाळ, वेदांत कासार, ऋत्विका सिरसे, मानसी कासार आदी मान्यवरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
रविवारचा दिवस असूनही शिंगणवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक संतोष घुले यांनी रेनकोट वाटपासाठी चांगले नियोजन केले होते. मुलांची व पालकांची उपस्थितीही लक्षणीय होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक मिलिंद कोकतरे, शकुंतला आवारी, गोरख गांगड ,लघु गांगड, मच्छिंद्र सुकटे ,मनोहर आढळ, राजाराम खाडगीर ,एकनाथ लांघी ,ठकुबाई लांघी, किरण धांडे आदींनी प्रयत्न केले. याप्रसंगी आदिवासी सेवक हिरामण सोनवणे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निवृत्ती पोकळे, शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष रामा पोकळे ,सखाराम मधे ,जालिंदर पोकळे, सुरेश पोकळे ,गोविंद सोनवणे,काळू बाबा पोकळे व ग्रामस्थ उपस्थित होते.

[गेल्या काही वर्षापासून अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व लेखन साहित्य वाटप करत आहोत. घाटघर परिसरात जास्त पर्जन्यवृष्टी होत असल्याने या मुलांना रेनकोटची आवश्यकता असल्याचे कळले होते. रेनकोट दिल्याने मुलांचे आरोग्य चांगले राहील व मुलांचे शिकणं सुखकर होईल अशी अपेक्षा आहे-
पायल मजुमदार
अॅप्रोच हेल्पिंग हॅन्ड फाउंडेशन पुणे.]

