पुन्य वार्ता
अहिल्यानगर (प्रतिनिधी):
डॉक्टर्स डे आणि राष्ट्रीय आरोग्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तसेच दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या उपस्थितीत एक प्रेरणादायी आणि सन्मानाची घटना घडली. जिल्ह्यातील ज्येष्ठ आणि कर्तव्यनिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनाली कुटे व डॉ. प्रदीप कुटे, आरोटे हॉस्पिटल चे डॉ. अतुल आरोटे व डॉ. सोनाली आरोटे, हरिश्चंद्र मेडीकल फाऊंडेशन संचलित काॅलेज ऑफ नर्सिंग आणि रिसर्च सेंटर संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. के. भांडकोळी तसेच अकोले हेल्थकेअर प्रा. लि.संचलित, अकोले हाॅस्पिटल अकोले फार्मा संस्थापक मॅनेजिंग डायरेक्टर सौ. रुपालीताई प्रकाश वाकचौरे यांना या विशेष दिनानिमित्त शुभेच्छा देत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दैनिक समर्थ गांवकरी तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या “डॉक्टर्स डे विशेषांक” चे प्रकाशनही डॉ. विश्वासराव आरोटे यांच्या हस्ते संपन्न झाले.

डॉ. विश्वासराव आरोटे यांनी यावेळी बोलताना डॉक्टरांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, “देव माणसाच्या रूपात पृथ्वीवर आला आहे – ही ओळ ज्या व्यक्तींना समर्पित करता येईल, ते म्हणजे डॉक्टर. जेव्हा एखादा माणूस मृत्यूच्या दाराशी उभा असतो, वेदनेने विव्हळत असतो, त्या क्षणी त्याला आधार देणारी, आशेचा किरण दाखवणारी आणि त्याचे प्राण वाचवणारी व्यक्ती म्हणजे डॉक्टर. त्यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.”

यावेळी डॉ. विश्वासराव आरोटे यांनी ब्राम्हणवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ही भेट दिली आणि नुकताच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ ‘आदर्श वैद्यकीय अधिकारी पुरस्कार’ प्राप्त केलेल्या डॉ. बाबासाहेब सोनवणे यांच्याशी सौहार्दपूर्ण भेट घेतली. डॉ. सोनवणे यांच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले व त्यांच्या सेवाभावाचे स्तुतिस्थान असल्याचे सांगितले.
यानंतर त्यांनी श्री सुखप्रदा हॉस्पिटलचे डॉ. सतीश वाळुंज आणि श्री दत्त क्लिनिकचे डॉ. प्रदीप कुमकर यांनाही प्रत्यक्ष भेटून डॉक्टर्स डेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉक्टरांशी सविस्तर संवाद साधत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात येणाऱ्या आव्हानांवर चर्चा केली आणि त्यांचे कार्य हे समाजाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.
या विशेष कार्यक्रमामुळे वैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, त्यांच्या कार्याची समाजात योग्य दखल घेतली जात असल्याचा विश्वास वाढला आहे.

डॉक्टर दिनाचे हे औचित्य सामाजिक सलोखा आणि वैद्यकीय कर्तव्य निष्ठेच्या जाणीवेने साजरे करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना एक वेगळा प्रेरणादायी संदेश मिळाला असून, त्यांच्या कार्यात अधिक आत्मीयतेने आणि निस्वार्थ भावनेने झोकून देण्यासाठी ऊर्जा मिळाली आहे.

