पुन्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- निळवंडेची उपसा यंत्रणा कार्यान्वित झाल्यामुळे धरणातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली असतानाही उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी वाहू लागले. कडक उन्हाळ्यात कळस गावांच्या बंधाऱ्यात निळवंडेचे पाणी पोहोचले. उन्हाळ्यात आलेले पाण्यामुळे तेथील माणसांना दिलासा मिळाला असून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले आहे. स्व. मधुकररावं पिचड यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण झालेची भावना आहे.
संगमनेर येथे दोन दिवसापूर्वी जलसंपदा विभागाची बैठक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षते खाली व आमदार डॉ किरण लहामटे, आमदार अमोल खताळ पाटील, माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांचे उपस्थितीत संपन्न झाली.
यावेळी अनेक शेतकऱ्यांनी
प्रश्न उपस्थित केले. याबाबद सकारात्मक निर्णय घेत उच्चस्तरीय चे पाणी कळस गावाला आजपर्यंत आले नव्हते असे निदर्शनास आणून दिले असता तातडीने कार्यवाही करीत आज पाणी पोहचले.
माजी मंत्री जलनायक मधुकरराव पिचड यांचे संकल्पनेतून फक्त अकोले तालुक्यासाठी असणाऱ्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय पाईप कालव्यांचा लाभ तालुक्यातील २ हजार ३२८ हेक्टर क्षेत्रास होतो. डाव्या उच्चस्तरीय कालव्याची लांबी २०.६८ किमी, त्याचे लाभक्षेत्र ८७१ हेक्टर तर उजव्या उच्चस्तरीय कालव्याची लांबी १९.३७ किमी व लाभक्षेत्र १ हजार ४५७ हेक्टर आहे. उच्च स्तरीय पाईप कालवे तलांक ६२७.४० मीटरवरून सुरू होतात. निळवंडे जलाशयाची पूर्ण संचय पातळी तलांक ६४८.१५ मी. आहे. उच्च स्तरीय पाईप कालवा हा तलांक ६३० मी ते ६४८ मी. या गुरुत्वीय दबावाने संकल्पित करण्यात आलेला आहे. म्हणजेच धरणातील पाणीपातळी जेव्हा तलांक ६३० मी. ते ६४८.१५ मी. दरम्यान असते तेव्हाच या उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी देता येते. पाणीपातळी तलांक ६३० मी. पेक्षा कमी झाली की धरणात पाणी असूनही या कालव्याद्वारे पाणी देता येत नव्हते. उच्चस्तरीय कालवे प्रणालीकरिता उपसा यंत्रणेची उभारणी करण्यात आली आहे. जलाशयात तलांक ६१४ मी. येथून १९५ अश्वशक्तीच्या दोन पंपांद्वारे हा पाणी उपसा ५५० मिमी आकाराच्या पाईपद्वारे वितरण कुंडात जमा होते. या ठिकाणी पाणीपातळी तलांक ६४२ मी. ठेवली जाते. यामुळे उच्चस्तरीय कालव्यातून बाराही महिने पाणी पुरवठा करता येणार आहे.
उन्हाळ्यात पाणी पाहायला मिळाले. हे पाणी ओढे, नाले, बंधारे यात सोडले जाते. पाणी जिरल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी वाढते. त्याचा लाभ त्या परिसरातील शेतकऱ्यांना होतो.
चौकट- उच्च स्तरीय कालवे झाले पासून कळस ला पाणी आले नव्हते मात्र संगमनेर च्या बैठकीत मुद्दा उपस्थित करताच जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी झाली. माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी विशेष सहकार्य केले आहे. कैलासराव वाकचौरे यांनी प्रयत्न केले आहे.
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
माजी सरपंच, कळस
