पुन्य वार्ता
अकोले, प्रतिनिधी :
जीवनामध्ये आपण किती पैसा कमावला यापेक्षा किती माणसे कमावली आणि समाजासाठी काय कार्य केले, हेच आपल्या यशाचे खरे मोजमाप आहे. वाढदिवस हा केवळ जल्लोष, डीजे, बँजो आणि पार्ट्यांसाठी नसून, तो स्वतःचे आत्मचिंतन करण्याचा आणि आगामी जीवनयात्रेचा आराखडा ठरवण्याचा दिवस आहे, असे उद्गार अकोले तालुक्यातील युवा उद्योजक तथा माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे देवठाण शाखा कमिटी अध्यक्ष श्रीकांत सहाने यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.
सहाने म्हणाले की, “लोक वाढदिवसाला लाखो रुपये फुंकतात, पार्ट्या करतात, पण आपल्या आयुष्यातून गेलेले वर्ष काय शिकवून गेले याचा विचार करत नाहीत. आपण किती कमावले यापेक्षा काय गमावले, काय सुधारता येईल आणि भविष्यात काय करायला हवे याचा आत्मपरीक्षण करणे म्हणजेच खरी अभिष्टचिंतन सोहळ्याची व्याख्या आहे. वाढदिवस साजरा करताना गोरगरीब विद्यार्थ्यांना पेन, वही देणे, सामाजिक कार्य करणे, किंवा कोणाला मदतीचा हात देणे हेच खरे सेलिब्रेशन आहे.”
त्यांनी पुढे सांगितले की, “मी स्वतः संघर्षाच्या काळातून प्रवास करून आज या उंचीवर पोहोचलो. कधी हार मानली नाही, कधी मागे हटलो नाही. सोन्यासारखी माणसे आपल्या सोबत असतील तर आपण किती श्रीमंत आहोत हे पैशाने मोजता येत नाही. समाजसेवा करताना मिळालेला नावलौकिक हीच आपल्या कार्याची खरी पावती आहे.”
या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस व दैनिक समर्थ गांवकरी चे संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांनी भाषण करताना म्हटले की, “श्रीकांत सहाने यांचा प्रवास हा एक प्रेरणादायी आदर्श आहे. पैसा प्रत्येक जण कमवू शकतो, पण त्याचा विनियोग समाजाच्या हितासाठी करण्याची वृत्ती फार कमी लोकांत असते. श्रीकांत सहाने यांच्याकडे धनलक्ष्मी आहे, पण त्याहून मोठी गोष्ट म्हणजे जनमानसातील त्यांची प्रतिमा. जनतेच्या मनात स्थान मिळवणे हीच खरी शिदोरी आहे. ‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या तत्त्वावर ते कार्य करतात, म्हणूनच जनता त्यांना एक युवा उद्योजक, एक युवा सारथी आणि एक युवा भूषण म्हणून पाहते.”
कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील, अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले, ज्येष्ठ नेते सुभाष सहाणे, माळशेज नागरी सहकारी पतसंस्थेचे शाखाधिकारी भाऊसाहेब पथवे, गुणवंत अधिकारी गोकुळ येलमामे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीकांत सहाने यांचा शाल, पुष्पगुच्छ, गंगागिरी महाराजांचा महाप्रसाद आणि पेढा भरवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे वातावरण उत्साही आणि प्रेरणादायी होते.



