पुन्य वार्ता
डोंगरगाव प्रतिनिधी
आमचे कर्तबगार आप्पा
अशोक यशवंत उगले यांचा जन्म अकोले तालुक्यातील डोंगरगाव या छोट्याशा गावात आई सिंधूताई व वडील यशवंत उगले यांच्या पोटी जन्म झाला.
शेती शिवाय उत्पन्नाचे दुसरे साधन नाही, त्यातच मोठे कुटुंब असल्यामुळे सुरवातीपासूनच अतिशय गरिबीची परिस्थिती होती. अशिक्षित कुटुंब त्यामुळे मर्यादा देखील जास्त होत्या. अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण सुरू असताना अशोक उगले आप्पा यांनी संगमनेर चावडी येथे श्री. साबळे आप्पा यांच्या हाताखाली पडेल ते काम सुरू करून कुटुंबाला देखील हातभार लावला. भावा, बहिणींच्या शिक्षणासाठी देखील मदत केली. वडील यशवंत भाऊ उगले हे एसटी परिवहन महामंडळात कंडक्टर कार्यरत होते. त्यामुळे ते सतत परगावी असायचे. जमीन अतिशय कमी असल्या कारणाने इतर कामे करण्याशिवाय पर्यायही नव्हताच. भाऊ सुनील यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यालाही संगमनेर येथील प्रांत कार्यालयात कामाला लावले. तसेच सुनीलने देखील जिद्दीने भावाला साथ देऊन कुंटुंबासाठी हातभर लावला.
एकीकडे परिस्थितीशी दोन हात करत असताना अशा परिस्थितीत देखील कै. अशोक उगले यांनी बहिणीचे लग्न करून त्यांना चांगल्या कुटुंबात दिले. कामाच्या अनुभवाप्रमाणे तसेच त्यांची काम करण्याची जिद्द व मेहनत पाहता त्यांची तलाठी पदावर नियुक्ती झाली. नंतर ते शहादा येथे कार्यरत झाले. कोल्हेवाडी येथील गुंजाळ परिवारातील उज्वला यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अशा परिस्थितीत संसार सुरू झाल्यानंतर या दांपत्याच्या संसार वेलींवर २ मुली व १ मुलगा असे
फुले उमलली. मुलांचा सांभाळ, चांगले संस्कार आणि चांगल्या रीतीने शिक्षण त्यांना दिले. मुलगा सिव्हिल इंजिनिअर, मुलगी उच्च पदवीधर, दुसरी मुलगी सिव्हिल इंजिनिअर. सर्व काही सुरळीत सुरू असताना अचानक वडिलांच्या निधनाने कुटुंबावर आभाळ कोसळले. त्या दुःखातून स्वतःला सावरुन आलेल्या परिस्थितीला सामोरे जात अशोकरावांनी ऑफिसचा कार्यभार सांभाळत अगदी जिद्दीने व मेहनतीने ‘नायब तहसीलदार’ पदी नियुक्ती मिळवली. त्यानंतर श्रीरामपूर या ठिकाणी ते कार्यरत झाले. परंतु नियतीचा खेळ सुरूच होता. सर्व सुरळीत सुरु असताना अचानक भावाचे आजाराने निधन झाले, असा प्रचंड मोठा धक्का सोसत आणि मनावर दगड ठेवून पुन्हा एकदा स्वतःला
सांभाळून कुटुंबासाठी परत त्याच उमेदीने कामाला सुरुवात केली.
काही दिवसांनी मुलींचे लग्न थाटामाटात पार करून त्यांना अतिशय उत्तम कुटुंबात दिले.
जावई आदित्य सुनील गायकवाड (mech Engg.), प्रशांत रमेश आरोटे (mech Engg.) अशाप्रकारे कुटुंबाचा विस्तार करत सर्व सुरळीतपणे चालू होते. २०२२ साली निवृत्ती घेत सर्व कामकाजाची जबाबदारी कमी केली. निवृत्तीनंतर काही दिवस स्वतःची आवड जोपासत तसेच अनेक गरजूंना मदत ते करित होते. तसेच गावाकडे समाजकार्य करीत गावांसाठी जमेल ती योजना राबून स्वतःला कामात त्यांनी व्यस्त ठेवले. गावात सर्वजण त्यांना आप्पा म्हणून ओळखत होते. त्यांच्या स्वभाव अतिशय मायाळू व सामंजस्य असल्याने त्यांनी माणसांशी खूप जवळीक निर्माण केली.
नेहमीप्रमाणे नियतीच्या मनात काहीतरी वेगळीच होते. ३-४ महिन्यापासून त्यांना आजाराने त्रस्त केले. अनेक ठिकाणी उपचार करूनही त्यात म्हणावे असे यश आले नाही. अखेर आमचा आनंद हरपला. सोमवार १३/१/२५ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे आमच्या कुटुंबातील आणखी एक लखलखता तारा निखळला. पप्पा तुम्ही केलेले कष्ट आणि आम्हाला संस्कारांची दिलेली शिदोरी कायम आमच्या सोबत राहिल. तुमचे राहिलेले स्वप्न आम्ही पुर्ण करू. तुमचा अखेरचा प्रवास सुखाचा होवो, तुम्हाला चिरशांती
लाभो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.
कु. मयुर उगले डोंगरगाव, ता. अकोले

