पुण्य वार्ता
अकोले :- इयत्ता १० वीची निकाल नुकताच लागला आहे, मुलांनी हे करावे, ते करावे, याच क्षेत्रात करिअर करावे, त्याच क्षेत्रात करिअय करावे अशा प्रकारचे बर्डन पालक त्यांच्या मुलांवर टाकताने दिसत आहेत. मात्र, आपल्या पाल्यास कोणत्या क्षेत्राची आवड आहे, त्याच्यासाठी ते क्षेत्र त्याचे करिअर करण्यासाठी योग्य आहे का, त्यात आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी वाव आहे का अशा गोष्टींची अभ्यास करुन पाल्याच्या पुढील शिक्षणाचा विचार केला पाहिजे. विद्यार्थी म्हणजे रेसमधील घोडा नसून तो माणूस आहे, त्याला देखील आवडी निवडी आहेत, त्याला बुद्धी असून त्या बुद्धीच्या देखील काही क्षमता आणि मर्यादा आहेत यांचा देखील विचार केला पाहिजे. जेव्हा शिक्षणाच्या संघर्षात त्यांचे पालक विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहतात तेव्हा निम्मे युद्ध मुले तेव्हाच जिंकलेले असतात. त्यामुळे, पालकांची भुमिका फार महत्वाची असल्याचे प्रतिपादन जलसंधारण अधिकारी सुरेश मंडलिक यांनी केले. ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंचखडक बु येथे इयत्ता ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थी व पालक मेळाव्याला मार्गदर्शन करताना बोलत होते.
मंडलिक म्हणाले. की, पुर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्याही सुविधा नव्हत्या. आता मात्र मोबाईल, युट्युब, गुगल आणि तज्ञ मार्गदर्शनाची शिबिरे उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे, ग्रामीण भागातील मुलांकडे टक्केवारी चांगली असून त्यांनी मार्गदर्शन घेतल्याशिवाय पुढचे पाऊल टाकू नये. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील स्पर्धेच्या युगात कोठे कमी नाहीत. त्यांनी स्वत:मधील कौशल्य ओळखून स्वत:चे अस्तित्व निर्माण करता येईल याचा विचार करुन पुढे पाऊल टाकले पाहिजे. विशेषत: पालकांनी ज्या विश्वासाने मुला-मुलींना बाहेर शिक्षणासाठी पाठविले त्याची जाणीव ठेवली पाहिजे, कोणत्याही वाम मार्गाला न जाता आई वडिलांचे स्वप्न साकार केले पाहिजे. आम्ही बाहेरील दुनिया पाहतो तेव्हा एकीकडे स्पर्धेचे युग दिसते तर दुसरीकडे उध्वस्त झालेली काही विद्यार्थी दिसतात. त्यामुळे, काय योग्य आणि काय अयोग्य याचे अकलन विद्यार्थ्यांनी करुन घ्यावे त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्याचा मित्र म्हणून भुमिका पार पाडली पाहिजे असे मंडलिक म्हणाले. त्यांनी १० आणि १२ वी नंतर कोणत्या क्षेत्रात जावे, कोणत्या क्षेत्रात किती वाव आहे याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी श्रृती दिलीप हासे (९० टक्के), उत्कर्ष द्वारकानाथ देशमुख (८९ टक्के), वैष्णवी प्रकाश देशमुख (८४ टक्के) युवराज विशाल देशमुख (७५ टक्के) या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ऍड. सागर शिंदे, शाळेचे मुख्याध्यापक रवि रुपवते, श्यामराव देशमुख, सागर देशमुख, गुणवत्ता कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय मंडलिक, भाऊसाहेब देशमुख , स्वरा शिंदे, गौरी शिंदे, स्वराज देशमुख यांनी परिश्रम घेतले.
चौकट
तुमच्याकडे ‘प्लॅन ए’ आणि ‘प्लॅन बी’
शिक्षण म्हणजे पुस्तकी ज्ञान नव्हे. तर तुम्हाला ज्या क्षेत्रात आवड आहे त्याची माहिती गोळा करणे म्हणजे शिक्षण, पुस्तकी ज्ञानासोबत विद्यार्थ्यांनी जागण्याची कौशल्य देखील विकसित केले पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला सरकारी नोकरी, खाजगी जॉब किंवा स्पर्धा परिक्षेत यश मिळेल असे बिल्कुल नाही. त्यामुळे, कोणी उद्योग, व्यापार, व्यवसाय किंवा अन्य क्षेत्रांमध्ये करिअर केले पाहिजे. तुमच्याकडे ‘प्लॅन ए’ आणि ‘प्लॅन बी’ दोन्ही असले पाहिजे. म्हणजे अपयशानंतर तुम्ही खचून जाणार नाही.
- दत्तात्रय मंडलिक (अध्यक्ष-गुणवत्ता कमिटी)


