पुण्य वार्ता
संगमनेर ( प्रतिनिधी ) बुद्धिमत्ता ही एका समाजाची मक्तेदारी नसून शिक्षणातून सर्वांना प्रगती करता येते. आदिवासी बांधवांनी मुलांच्या शिक्षणावर अधिक लक्ष देऊन त्यांना चांगले शिक्षण दिल्याने त्या विद्यार्थ्यांबरोबर समाजाची मोठी प्रगती होणार आहे. या भूमीचा मूळ मालक असलेल्या आदिवासी बांधवांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.
संगमनेर बस स्थानक ते यशोधन कार्यालय दरम्यान आदिवासी विद्यार्थ्यांनी वेगवेगळी वेशभूषा करून भव्य रॅली काढली. याचबरोबर यशोधन कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी नृत्य सादर केले. यावेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ.सुधीर तांबे,आदिवासी सेवक प्रा.बाबा खरात, अजय फटांगरे, आदिवासी तालुकाध्यक्ष बाळकृष्ण गांडाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाला आहे. भारतामध्ये आज सर्वजण समान आहेत. शिक्षणातून प्रगतीची मोठी संधी आहे. कोळवाडे येथे जयहिंद आदिवासी आश्रम शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना अत्यंत गुणवत्तेचे व दर्जेदार शिक्षण मिळाले आहे. यामुळे या समाजातील अनेक विद्यार्थी मोठ्या पदांवर कार्यरत आहे. अमृतवाहिनी मॉडेल स्कूल मध्ये आदिवासी विभागातील अनेक विद्यार्थी असून त्यांना अत्यंत दर्जेदार शिक्षण तेथे मिळत आहे.
आदिवासी हे या भूमीचे मूळ मालक असून भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. राघोजी भांगरे,तंट्या मामा भिल्ल, बिरसा मुंडा, उमाजी नाईक यासारख्या क्रांतिकारकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढाई केली. अत्यंत शूर आणि धाडसी असलेल्या या समाजातील अनेक वीरांनी देशासाठी बलिदान दिले. या समाजातील अनेक विद्यार्थी आता उच्च शिक्षण घेत असून चांगल्या शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असे ते म्हणाले.
तर डॉ.सुधीर तांबे म्हणाले की, 9 ऑगस्ट क्रांती दिन हा भारत छोडो आंदोलनामुळे इतिहासामध्ये नोंदला गेला याच दिवशी आदिवासी गौरव दिन आहे. आदिवासी हे जंगलाचे राजे आहेत परंतु आता ते शहरांचे राजे झाले पाहिजे. यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी अधिक काम केले पाहिजे.स्वकर्तृत्वातून पुढे या असे आव्हान त्यांनी केले.
तर आदिवासी सेवक प्रा बाबा खरात म्हणाले की, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आदिवासी समाजाच्या विकासाकरता सातत्याने मोठमोठ्या योजना राबवल्या आहेत. जयहिंद आदिवासी आश्रम शाळा, त्याचबरोबर घुलेवाडी येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेलची निर्मिती केली आहे यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची मोठी संधी निर्माण झाली असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या आदिवासी नृत्याला उपस्थित कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठी दाद दिली. आदिवासी समाजातील बाळकृष्ण गांडाळ, धनश्री माळी यांसह गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.


