पुण्य वार्ता
अकोले प्रतिनिधी- आजचे युग हे स्पर्धेचे युग असून शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करावी असे प्रतिपादन रोटरी क्लब अकोले सेन्ट्रल चे अध्यक्ष प्रा.विद्याचंद्र सातपुते यांनी केले.
ते अकोले तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या शासकीय आश्रमशाळा
पळसुंदे येथील
एमकेसीएल व संदेश कॉम्पुटर्स अकोले यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ऑलम्पियाड परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप व परिक्षेत सहभागी झाले म्हणून आश्रमशाळेला सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प कार्यलय राजूर चे सेवा निवृत्त कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र पवार होते.
यावेळी संदेश कॉम्प्युटर्स चे संचालक हेमंत मोरे,मुख्याध्यापक डॉ.पंडित कदम, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा.सातपुते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय हे आतापासूनच ठरविले पाहिजे, ते ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ती माहिती घेतली पाहिजे.आजच्या तंत्रज्ञान युगाच्या काळात आपल्याला सर्व माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.शालेय जीवनापासून छोट्या छोट्या स्पर्धा परीक्षा दिल्यातर आपल्या मनातील भीती कमी होईल, आपला आत्मविश्वास वाढेल त्यादृष्टीने सर्व विद्यार्थ्यांनी कोणतीही परीक्षा असेल तर त्यात सहभाग घ्यावा.त्यामुळे भविष्यात मोठया परीक्षा देताना अडचण येणार नाही,अतिदुर्गम भागातील आदिवासी समाजाचे अनेक विद्यार्थी आज उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे कोणीही मनात न्यूनगंड न बाळगता आत्मविश्वासाने आपले ध्येय साध्य करावे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पवार म्हणाले की,पूर्वी च्या विदयार्थ्यांना पुरेशा शैक्षणिक सुविधा मिळत नव्हत्या, इमारती नव्हत्या तरी विद्यार्थी अभ्यास करून आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत. तुम्हीही या संधीचा उपयोग करून घेऊन आपल्या जिवनात यशस्वी व्हावे अशा शुभेच्छा दिल्या.
संदेश कॉम्प्युटर्स चे संचालक हेमंत मोरे यांनी प्रास्ताविक करताना तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी या ऑलिम्पियाड परीक्षेत सहभाग घेतला, या आश्रमशाळेचे विद्यार्थी ही सहभागी झाले, त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढेही असाच सहभाग सर्व विद्यार्थ्यांनी नोंदवावा असे आवाहन केले.
मुख्याध्यापक डॉ.पंडित कदम यांनीही मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन सतीश कासार यांनी केले, आभार संतोष पांडे यांनी मानले.

